मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांकडून पुनर्वसनचे आश्वासन

मीरा रोडमधील सिल्वर पार्क आणि विजय पार्क परिसरातील फेरीवाल्यांवर मीरा-भाईंदर महानगरपालिकेने कारवाई केल्यानंतर गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी फेरीवाल्यांना बसण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु महापालिकेच्या या भूमिकेमुळे पदपथ विक्रेता आजीविका संरक्षण व नियमन कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करून फेरीवाल्यांनी सोमवारी महापालिकेच्या मीरा रोड येथील प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून फेरीवाल्यांची जनवादी हॉकर्स सभा ही संघटना आणि महापालिका आयुक्त यांच्या चर्चा घडवून आणली.

कोणत्याही फेरीवाल्यांवर कारवाई करायची झाल्यास संबंधित फेरीवाल्यांवर पदपथ विक्रेता आजीविका संरक्षण व नियमन कायदा २०१४ अनुसार कारवाई करण्याआधी शहर फेरीवाला समिती स्थापन करुन फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करणे, फेरीवाल्यांना परवाने देणे आणि त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचा मुद्दा जनवादी हॉकर्स सभेचे अ‍ॅड्. किशोर सामंत यांनी उपस्थित केला आहे.मीरा रोड येथील रामदेव पार्क आणि हटकेश भागात महापालिकेने तात्पुरत्या मंडया सुरू केल्या आहेत. परंतु विजय पार्क भागात महापालिकेने अशी कोणतीही मंडई अद्याप सुरू केलेली नाही. असे असताना फेरीवाल्यांना याठिकाणी व्यवसाय करू दिला जात नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे शिवाय येथील रहिवाशांना जवळपास बाजार नसल्याने त्यांचीदेखील गैरसोय होत आहे, असा आक्षेप जनवादीतर्फे घेण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर संघटनेच्या माध्यमातून मीरा रोड येथील प्रभाग कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु त्याआधीच पोलिसांनी संघटनेचे पदाधिकारी आणि माहापालिका आयुक्त यांच्या चर्चा घडवून आणली. यासंदर्भात लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त बालाजी खतगांवकर यांनी दिले असल्याची माहिती अ‍ॅड्. किशोर सामंत यांनी दिली.