कचराभूमी हटवण्याच्या राजकीय घोषणा अधांतरी; भूखंडावर घनकचरा व्यवस्थापन आरक्षण टाकण्याचा पालिकेचा निर्णय

ठाणे महापालिका क्षेत्राच्या वेशीवरील दिवा भागातील बेकायदा कचराभूमीमुळे स्थानिक नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच ही कचराभूमी हटविण्याऐवजी प्रशासनाने आता कचराभूमी अधिकृत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता या जागेवरील रहिवास तसेच हरित क्षेत्र बदलून त्या जागी घनकचरा व्यवस्थापन आरक्षण टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने आज, मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राच्या वेशीवर दिवा परिसर येतो. या परिसरातील खासगी जागांवर बेकायदा कचराभूमी उभी राहिली आहे. महापालिका घनकचरा विभागाकडून संपूर्ण शहरातील कचरा गोळा करण्यात येतो. त्यानंतर गोळा झालेला सर्व कचरा दिव्यातील कचराभूमीवर टाकण्यात येतो. या ठिकाणी कचऱ्याचे मोठे डोंगर उभे राहिले आहेत. कचराभूमीवरील दुर्गंधी परिसरात पसरत असून यामुळे स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. याशिवाय, कचऱ्याला आग लागल्यानंतर त्याचा धूर संपूर्ण परिसरात पसरतो. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर दिव्यातील कचराभूमी हटविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात असून या मागणीसाठी राजकीय पक्षांकडून आंदोलने करण्यात आली होती. ही कचराभूमी लवकरच बंद करण्यात येणार असल्याचे आश्वासन पालिकेकडून देण्यात आले होते. मात्र, त्याची अजूनही अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. असे असतानाच प्रशासनाने आता ही कचराभूमी अधिकृत करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे पुढे आले आहे.

डावले येथील सव्‍‌र्हे क्रमांक २११, २१२, देसाई येथील सव्‍‌र्हे क्रमांक २२३, २२४ आणि दिवा येथील सव्‍‌र्हे क्रमांक ७९ येथील भूखंडावर हरित विभाग असे आरक्षण आहे. साबे येथील सव्‍‌र्हे क्रमांक ३७, ५७, ५८, ५९, ६०, ७२ या भूखंडावर हरित विभाग असे आरक्षण आहे, तर साबे येथील सव्‍‌र्हे क्रमांक ३८, ६१ या भूखंडावर रहिवास आणि हरित विभाग असे आरक्षण आहे. सद्य:स्थितीत या भूखंडावर कचराभूमी असून त्या ठिकाणी शहराचा कचरा टाकण्यात येतो. या कचऱ्याची विल्हेवाट जैविक पद्धतीने शास्त्रीयदृष्टय़ा पर्यावरणपूरक करण्यासाठी प्रशासनाने येथील भूखंडावर

आता घनकचरा व्यवस्थापन असे आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. आज, मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावास स्थानिक नागरिकांनी विरोध केला असून त्यासाठी महापालिकेकडे निवेदन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रस्तावातील ठळक मुद्दे

* डावले, देसाई, साबे आणि दिवा या भागांतील भूखंडांवर घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदलाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

* या फेरबदलाच्या प्रस्तावावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या नाही तर आयुक्तांच्या स्तरावर निर्णय घेऊन प्रस्ताव शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यासाठी आयुक्तांना प्राधिकृत करण्यास मान्यता मिळावी, असे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे.