ग्रंथसखा वाचनालय, बदलापूर (पू.)
२७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून बदलापूर येथील ग्रंथसखा वाचनालयातून उगम पावलेल्या स्वायत्त मराठी विद्यापीठाचे लोकार्पण होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने या संस्थेच्या कार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप..
‘बदलापूरातील ग्रंथसखा वाचनालय’ हे नाव आता या शहराची ठळक ओळख म्हणून आपल्या समोर येत आहे. निसर्ग ट्रस्ट अंतर्गत २००४ साली सुरू झालेल्या या वाचनालयाची पाळेमुळे आता घट्ट रोवली गेली असून एक नवी झेप घेण्यासाठी हे वाचनालय आता सज्ज झाले आहे. ग्रंथसखाचे सर्वेसर्वा श्याम जोशी यांनी गेल्या दहा वर्षांत अपार मेहनतीतून उभे केलेले हे वाचनालय आता पाच हजार वाचकांना सेवा देत आहे.
श्याम जोशी यांचा जीवन प्रवास अंमळनेर-कल्याण असा होत बदलापूरला स्थिरावला. त्यांच्या वडिलांचा आणि साने गुरुजींचा स्नेह होता. घरात साने गुरुजींचे संस्कार होतेच आणि त्यानंतर तीस वर्षे कल्याण येथे शाळेत शिक्षकी पेशाची नोकरी यामुळे वाचनाची गोडी त्यांना लहानपणापासून होती. स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून त्यांनी वडिलांची व स्वत:ची वाचनाची आवड जोपासण्यासाठी स्वत:ला ग्रंथ चळवळीत झोकून दिले व त्यातून ग्रंथसखा वाचनालयाची निर्मिती झाली. ग्रंथसखा वाचनालय आता बदलापूर शहरापुरतेच मर्यादित राहिले नसून संपूर्ण महाराष्ट्रभर वाचनालयाची कीर्ती पसरली आहे. राज्यभरातून सध्या अनेक लेखक, मोठमोठे साहित्यिक व वाचक वाचनालयाला भेट देत आहेत. याचे कारण असे की, पंचवीस हजारांहून अधिक पुस्तके, कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय ६० रुपये मासिक वर्गणी. ग्रंथसखा वाचनालयाच्या या वाचक सेवेबद्दल संचालक श्याम जोशी यांना ठाणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गौरवण्यात आले होते. ग्रंथसखा वाचनालयाने स्थापनेपासून विविध साहित्यविषयक कार्यक्रम हाती घेण्यास सुरुवात केली. यात वाचक मेळावे, पुस्तक प्रदर्शन, व्याख्यानमाला, साहित्यिकांच्या स्मृती जपण्यासाठी विशेष कार्यक्रम त्यांनी आयोजित केले. त्यातील सर्वात संस्मरणीय कार्यक्रम म्हणजे पहिल्या दिवाळी अंकाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी पहिल्या दिवाळी अंकापासून आजपर्यंतच्या दिवाळी अंकांचे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण म्हणजे १९०९ साली रघुनाथ मित्र यांनी सुरू केलेला मासिक मनोरंजन पहिला दिवाळी अंक होय. वाचकांच्या विस्मृतीत गेलेले आत्तापर्यंतचे सगळेच दुर्मीळ दिवाळी अंक तेथे पाहायला मिळाले.  गेल्या दहा वर्षांत सुभाष भेंडे, मंगेश पाडगावकर यांपासून डॉ. द. भि. कुलकर्णी ते नवनिर्वाचित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्यापर्यंत साऱ्याच बडय़ा साहित्यिकांनी येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. ‘मला फक्त वाचनालय उभे करायचे नसून मराठी भाषेच्या वाचकांची चळवळ सुरू करायची आहे. लोकांना वाचायची आवड असून लेखनाची बाजू बऱ्याच जणांची कमकुवत असते. याचे कारण दहावीनंतर मराठीशी संबंध संपतो व इंग्रजीची साथ सुरू होते. मराठी भाषेला जर वाचक आणि अभ्यासक लाभले तर मराठी भाषा समृद्ध होईल. त्यामुळे अभिजात वाचकाची निर्मिती करणे हे ग्रंथसखाचे उद्दिष्ट आहे’, असे श्याम जोशी नेहमीच म्हणतात. याचेच प्रत्यंतर सध्या दिसू लागले असून पारंपरिक पुस्तकांच्या वाचनालयापासून थोडा वेगळा निघालेला दुर्मीळ पुस्तकांचा संदर्भ वाचनालयाचा विभागही आता मोठा झाला असून, त्याने एका मराठी भाषेच्या विद्यापीठाचे रूप धारण केले आहे. गेल्या काही वर्षांत ग्रंथसखा वाचनालयाने अत्यंत दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह केला असून या पुस्तकांनीही आता ५० हजार पुस्तकांचा टप्पा पार केला आहे. बाबा पदमनजींनी लिहिलेली पहिली मराठी कादंबरी- ‘यमुना पर्यटन’ची पहिली प्रत तर रघुनाथ गोडबोले यांनी १८३८ मध्ये लिहिलेला व खिळे आणि ठोकळ्यांच्या साहाय्याने मुद्रित करण्यात आलेला यात्रेकरूंचा वृत्तान्त हे पुस्तकही येथे उपलब्ध आहेत.
त्याचप्रमाणे वाङ्मय कोश, विश्वकोश, समाज विज्ञान कोश, सरिता कोश, व्याकरण कोश, आध्यात्मिक कोश, क्रीडाकोश, गोज्ञान कोश, व्यावहारिक ज्ञानकोश असे तब्बल १३० च्यावर वेगवेगळे मराठी भाषेतील कोश येथे उपलब्ध आहेत. ज्येष्ठ सूचिकार शंकर गणेश दाते यांनी १८०६ सालापासून संशोधित केलेल्या मराठी साहित्याच्या सूचीचे सारेच खंड येथे उपलब्ध आहेत. तसेच साहित्यिकांची पत्रे, पेशवेकालीन दप्तरातील पत्रे, प्राचीन हस्तलिखिते, दोलामुद्रिते येथे पाहावयास मिळतात. मराठी भाषेशी निगडित दोन लाख पुस्तकांचा संग्रह करण्याचा ग्रंथसखाचा मानस आहे. या दुर्मीळ मराठी ग्रंथसंपदेच्या जोरावर श्याम जोशी यांनी मुख्य वाचनालयाच्या समोर मराठी भाषेचे पहिले स्वायत्त मराठी विद्यापीठ निर्माण केले असून येत्या २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून या विद्यापीठाचे लोकार्पण होणार आहे. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी हे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कामकाज पाहणार आहेत. या विद्यापीठाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येत्या २७ फेब्रुवारीला बदलापूरला सर्व साहित्यिक उपस्थित राहण्यासाठी डॉ. द. भि. कुलकर्णी स्वत: प्रयत्नशील असून डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे तसेच आत्तापर्यंत अध्यक्षपद भूषवलेले सर्वच अध्यक्ष येथे उपस्थित राहणार आहेत. या स्वायत्त विद्यापीठामध्ये मराठी भाषेशी निगडित ५० अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात आली असून त्यासाठी लागणारी सर्व पुस्तके येथे उपलब्ध आहेत. मराठी भाषा व व्याकरण, इतिहास, कला, संस्कृती असे वेगवेगळे विभाग तयार करण्यात आले असून पीएचडीचे अभ्यासक आदींनी येथे विद्यापीठामार्फत मार्गदर्शक म्हणून गाइडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच येथे येणाऱ्या वाचक व अभ्यासकांसाठी राहण्याची व जेवणाची सोयदेखील उपलब्ध करण्यात आली आहे. थोडक्यात, गेल्या दहा वर्षांत ग्रंथसखा वाचनालयाच्या माध्यमातून लोकवर्गणीद्वारे श्याम जोशी यांनी सुरू केलेली ही मराठी भाषेच्या वाचकांची चळवळ आता
बदलापूर शहरालाच नव्हे तर संपूर्ण राज्यातील मराठी भाषकांना समृद्ध करणार आहे.
संकेत सबनीस

Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
youth beaten, love jihad
‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार
Controversy on Ramayana
सीतेच्या हातून रावणाला गोमांस, हनुमानाचं विकृत चित्रण, विद्यापीठातील नाटकाचा वाद आहे काय?
Gujarat University Vice-Chancellor Dr Neerja Gupta
“फक्त नमाज अदा करणं हे हिंसाचाराचं कारण..”, विदेशी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर गुजरातच्या कुलगुरुंचं विधान