मिरवणूक निर्बंधांमुळे वसई-विरार महापालिका यंदा सकारात्मक

वसई : यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीवर निर्बंध असल्याने फिरते कृत्रिम तलाव तयार करण्याची मागणी पुढे आली आहे. पालिकेनेही यंदाची गरज लक्षात घेता कृत्रिम तलावाबाबत सकारात्मकता दार्शविली आहे.

सध्या करोनाचे संकट असल्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी बहुतांश मंडळांनी छोटय़ा तसेच शाडूच्या मूर्त्यां आणण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाचे संकट कमी झाले नसल्याने शासनाने सर्व धार्मिक उत्सवांवर निर्बंध घातले आहेत. त्यासाठी अनेक मंडळांनी लहान मूर्त्यां बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

विसर्जन मिरवणुकीलाही परवानगी नसल्याने साधेपणाने गणेशाचे विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी शहरात कृत्रिम तलावांची गरज निर्माण झालेली आहे. गणेशोत्सव काळातील तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम तलाव तयार करून त्यात गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, अशी संकल्पना काही वर्षांपासून रुजू झाली होती.

मुंबईसह ठाणे आणि इतर महापालिकेत या कृत्रिम तलावांच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत होता. वसई-विरार महापालिका देखील दरवर्षी कृत्रिम तलावांची घोषणा करत होती. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. यंदा गणेशोत्सवाचा साधेपणा आणि विसर्जन मिरवणुकीवरील निर्बंध लक्षात घेता कृत्रिम तलाव तयार करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

विसर्जन मिरवणुकीवर निर्बंध असल्याने पालिकेने फिरते कृत्रिम तलाव करायला हवेत अशी सूचना माजी नगरसवेक अजीव पाटील यांनी केली आहे. छोटय़ा टेम्पोत कृत्रिम तलाव तयार करून तो ठिकठिकाणी फिरविण्यात यावा. त्यामुळे भाविकांना आपल्या घरासमोर टेम्पो आल्यावर त्यात विसर्जन करता येणार आहे. सर्वाच्याच मूर्त्यां यंदा लहान आकाराच्या असणार आहेत. त्यामुळे कृत्रिम तलावाच्या ठिकाणी न जाता, विसर्जन मिरवणुक न काढता गणेशमूर्तीचे विसर्जन होऊ  शकेल असे त्यांनी सांगितले.

तीन वर्षांपूर्वी पालिकेने गाजावाजा करत कृत्रिम तलाव राबविण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात अमंलबजावणी झालेली नव्हती. जनजागृती झाली नाही असे कारण देत कृत्रिम तलाव उभारण्यात आले नव्हते. २०१७ मध्ये पालिकेने शहरात २२ ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्याच्या जागा निश्चित केल्या होत्या. सात फुटांचा तलाव खोदून त्याला बॅरिकेड्स लावणे, त्यात प्लॅस्टिक अंथरणे, संरक्षणासाठी सिमेंटच्या गोण्या लावणे आदी कामांसाठी प्रत्येकी १६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. शहरातील नऊ प्रभागात असे कृत्रिम तलाव उभारण्यात येणार होते. मात्र तेव्हा देखील वेळ कमी, जनजागृती नाही अशा कारणांमुळे ऐनवेळी ही योजना रखडली होती.

पालिकेने यंदा कृत्रिम तलावांबाबत सकारात्मकता दाखवली आहे. कृत्रिम तलाव ही चांगली संकल्पना आहे. आयुक्त यावर योग्य निर्णय घेतील.

राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, महापालिका

कृत्रिम तलावांच्या बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र त्यावर नियोजन करून निर्णय घेतला जाईल.

– गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार महापालिका