कल्याण रेल्वे स्थानकात तिकिट आणि गाडीसाठी ५० मिनिटे धिंगाणा
जळगावला जाणारी हावडा गाडी चुकल्याने आणि पत्नी व स्वत:ची चुकामुक झाल्याने संतप्त झालेले जळगाव येथील खासदार ए. टी. ऊर्फ नाना पाटील यांनी शुक्रवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानकात पन्नास मिनिटे धिंगाणा घातला. ‘मला तातडीने जळगावकडे जाणाऱ्या गाडीची खालच्या बर्थची तिकिटे आणि तातडीने गाडीची सोय करा’, असे सांगत खा. पाटील यांनी कल्याण रेल्वे स्थानक व्यवस्थापक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, असे रेल्वे सूत्राने सांगितले.
लांब पल्ल्यांच्या गाडय़ांची वेळ, तेथील अतिमहत्त्वाची आरक्षित तिकिटांची सुविधा तातडीने उपलब्ध करणे अशक्य आहे. पण, खासदार म्हणून आम्ही आपल्या सोयीप्रमाणे गाडी व अतिमहत्त्वाच्या साठय़ातील तिकिटे देण्याचा प्रयत्न करतो, असे खासदार महाशयांना रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला; त्या वेळी खासदारांचा पारा आणखीच चढला. ‘मी भाजपचा खासदार पडलो म्हणून नाही तर, तुम्हा उत्तर भारतीयांना शिवसेनेचा हिसका योग्य असतो,’ असे सांगत खा. पाटील यांनी उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांचा पाणउतारा केला.
खा. पाटील शुक्रवारी मुंबईत आपल्या कामानिमित्त आले होते. त्यांनी जळगावला परतण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते हावडा, छ. शिवाजी टर्मिनस ते अमृतसर या दोन गाडय़ांची परतीची दोन तिकिटे काढली होती. कामे उरकून दादर रेल्वे स्थानकात परतल्यानंतर ते चुकून जळगावऐवजी पुणे येथे जाणाऱ्या गाडीत बसले. पुण्यातील गाडीत त्यांचे आरक्षण नव्हते. त्यामुळे दादर ते कल्याण असा पाऊण तास त्यांनी कसाबसा प्रवास केला. गाडी चुकल्याने खासदार अस्वस्थ होते. कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर उतरल्यावर त्यांनी तातडीने तेथील रेल्वे स्थानक व्यवस्थापक इंद्रसेन सिंग आणि एस. के. गुप्ता या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. ‘आपणास जळगाव येथे जायाचे आहे. आपली एक गाडी चुकली आहे. त्यामुळे आपण मी खासदार असल्याने मला तातडीने शालीग्राम एक्स्प्रेसची खासदार कोटय़ातील अतिमहत्त्वाची तिकिटे उपलब्ध करून द्या,’ असे पाटील यांनी फर्मावले. ‘आपण मागणी करीत असलेल्या गाडीची तिकिटे आरक्षित झाली आहेत. प्रवासी याद्या तयार आहेत. ती गाडी पुढच्या प्रवासाला रवाना झाली आहे,’ असे रेल्वे अधिकाऱ्यांनी खा. पाटील यांना सांगताच, तळपायाची आग मस्तकाला गेलेल्या खासदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांवर शिव्यांचा भडिमार केला, असे रेल्वे सूत्राने सांगितले.
खासदार असूनही आपण मला अशी उलटसुलट उत्तरे कशी देऊ शकता? उत्तर भारतीय असलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांना उद्देशून खा. नाना पाटील यांनी, ‘तुम्हाला शिवसेनेकडून जो नेहमी हिसका दाखविला जातो तोच योग्य आहे’, असे ऐकवून अधिकाऱ्यांचा पाणउतारा केला. अतिमहत्त्वाचे तिकीट मिळेपर्यंत आपण महत्त्वाच्या प्रतीक्षालयात बसून राहा. आपण किमान खुर्चीवर बसून तर घ्या, असे आर्जव रेल्वे अधिकाऱ्यांनी करूनही घुश्शात असलेल्या नाना पाटील यांनी अधिकाऱ्यांची मागणी फेटाळली. त्यांच्याकडे न पाहताच, खासदाराला अशी वागणूक देता, असे म्हणून गुरगुर केली, असे रेल्वे सूत्राने सांगितले. आपली पत्नी हावडा एक्स्प्रेसने प्रवास करीत आहे. तिची नि माझी चुकामुक झाली आहे. तिचा भ्रमणध्वनी बंद लागतोय. त्यामुळे हावडा गाडीतील तिकीट तपासनीसांशी संपर्क करून त्या गाडीत आपणास एक बर्थ आरक्षित करा, असे नाना पाटील अधिकाऱ्यांना सांगत होते. हे शक्य नाही, अशी नकारात्मक उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळाली, की खासदार पाटील संतप्त होत होते. रात्री १२ वा. ९ मिनिटांची हावडा मेल कल्याण रेल्वे स्थानकात आल्यानंतर पाटील यांच्यासाठी तातडीने विशेष आसनाची रेल्वे अधिकाऱ्याने सोय केली. ती आसन व्यवस्था वरची असल्याने, पाटील यांनी ते आसन स्वीकारण्यास नकार दिला. इतर सर्व आसने आरक्षित असल्याचे सांगूनही खासदार महाशय काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर हावडा मेलनेच मिळालेले आसन पटकावत खा. पाटील जळगावला रवाना झाले.
दरम्यान, या घटनेची कोणतीही माहिती नसल्याचे पाटील यांचे जळगाव येथील खासगी स्वीय सहाय्यक अमोल जाधव यांनी सांगितले. तर पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे तक्रार
कल्याण रेल्वे स्थानकात घडल्या प्रकाराची खा. पाटील यांनी रेल्वे मंडळ आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवरून झालेल्या चौकशीत सर्व रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार नाना पाटील यांच्या ‘कृती’ची, रेल्वे स्थानकावरील वागणुकीची माहिती वरिष्ठांना दिली असल्याचे समजते.