पालघर जिल्ह्य़ात आरोग्य खात्याच्या निष्काळजीपणाचे सर्वत्रच वाभाडे निघत असतानाच खासदार गोपाळ शेट्टी यांनी दत्तक घेतलेल्या वाडा तालुक्यातील गोद्रे या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेमुळे येथील सुरक्षा पाटील (१४) या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे गोद्रे प्राथमिक आरोग्य केंद्र आदिवासी विकास मंत्री म्हणजेच पालघर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या मूळ गावापासून काही अंतरावरच असूनसुद्धा या आरोग्य केंद्रात गेल्या वर्षभरापासून पूर्णवेळ एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याचे समोर आले आहे.
गोऱ्हे गावालगतच असलेल्या साई देवळी येथील आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या सुरक्षाला सोमवारी रात्री दीड वाजता आपल्या घरात झोपलेली असताना सर्पदंश झाला. सुरक्षाला तातडीने गोत्रे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी एकही डॉक्टर हजर नव्हता. आरोग्य केंद्रात हजर असलेल्या आरोग्य सेविकेने रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास सांगितले. सुरक्षाच्या वडिलांनी रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र रुग्णवाहिका बंद असून रुग्णवाहिकेचा चालकही नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. खासगी वाहनाच्या साहाय्याने सुरक्षाला पुढील उपचारासाठी वाडा येथे नेत असताना तिचा मृत्यू झाला.
खासदार गोपाळ शेट्टी यांनी गोऱ्हे हे गाव दत्तक घेतले आहे. मात्र वर्षभरात त्यांनी या ठिकाणी कुठल्याही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. याच गावाशेजारी गोपाळ शेट्टी यांनी यापूर्वी मोठय़ा प्रमाणात जमीन खरेदी केल्यामुळे त्यांनी हे गाव दत्तक घेतल्याचे गोऱ्हे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. आदिवासीविकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा यांचा मतदारसंघात गोऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणारी ४२ गावे असतानाही या आरोग्य केंद्राची दुरवस्था झाल्याने पालकमंत्र्यांच्या कामकाजाबद्दल ग्रामस्थ साशंक आहेत.
या परिस्थितीकडे पाहता मंगळवारी सकाळी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. याबाबत माहिती मिळताच पालघरचे साहय्यक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने भेट देऊन या ठिकाणी  वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली.

* गोद्रे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली १८ उपकेंद्र येत असून ४२ गावाांचा समावेश आहे.
* आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तीन जागा मंजूर असून गेल्या वर्षभरात या ठिकाणी पूर्णवेळासाठी एकही वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली नाही.
* आरोग्य सहकारीपदाच्या चार जागा असून तीन रिक्त आहेत. आरोग्य सेविकाच्या चार पैकी दोन रिक्त आहेत. शिपाईपदाच्याही अनेक जागा रिक्त आहेत.
* रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला चालक उपलब्ध नसल्याने ती बंद अवस्थेत आहे.

दुसरा बळी
गोऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेचा गेल्या आठ दिवसातील हा दुसरा बळी. २२ जुलै रोजी याच ठिकाणी उपचार न मिळाल्यामुळे आमगाव येथील सर्पदंश झालेल्या सुकत्या बरफ (५८) या आदिवासीचा मृत्यू झाला.

सुरक्षाला वेळीच उपचार मिळाले असते तर तिचा जीव वाचला असता. डॉक्टरांच्या अभावामुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाला.
– गोपाळ पाटील, सुरक्षाचे वडील