मध्य रेल्वेच्या फलाटांच्या उंची वाढविण्याच्या खटाटोपात ठाणेपल्याडची रेल्वे स्थानके अक्षरश: धुळीने माखू लागल्याचे वृत्त ‘लोकसत्ता, ठाणे’ने प्रसिद्ध करताच पालकमंत्री एकनाथ िशदे आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी ठाणे स्थानकाला भेट देऊन यासंबंधीची पाहणी केली. फलाटांवर रखडलेल्या कामांमुळे सर्वत्र सिमेंटच्या गोण्या, रेतीचे ढीग, बांधकाम साहित्य पडल्याचे त्यांना आढळून आले. त्यावर संतापलेल्या पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत ही स्थानके ‘धूळमुक्त’ करण्याचे आदेश दिले. ‘आधीच गर्दीमुळे जीव नकोसा झालेल्या प्रवाशांना धुळीचा त्रास कशासाठी’, असा सवालही या वेळी त्यांनी उपस्थित केला.
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची वाढवण्याच्या कामासाठी स्थानकात सिमेंटच्या गोण्या, लाद्या, पेव्हर ब्लॉक यांचे ढीग जमा करण्यात आले आहेत. मात्र, संथगतीने सुरू असलेल्या या कामांमुळे प्रवाशांच्या वर्दळीत अडथळे येत आहेत. याशिवाय या बांधकामाच्या धुळीने प्रवाशांना त्रस्त करून सोडले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील ठाण्याच्या पल्याड असलेल्या स्थानकांमध्येही प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे स्थानकातील फलाट आणि लोकल गाडी यांच्यामधील अंतर जीवघेणे ठरत असताना कमी वेळात प्रवाशांना चढावे अथवा उतरावे लागते. मोठी फट असलेल्या ठिकाणचे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने फलाटांची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले असले तरी ते अत्यंत संथगतीने चालत आहेत. काही ठिकाणी ही कामे रखडली असून त्याचा त्रास प्रवाशांना करावा लागत आहे. खडीचे ढीग, सिमेंटच्या गोण्या, लाद्या, पेव्हर ब्लॉक या अडथळ्यातून मार्ग काढून बाहेर पडावे लागते. तर यामुळे निर्माण होणाऱ्या सिमेंटच्या धुळीमुळे संसर्गाचा त्रास प्रवाशांना होत आहे.
या घटनेचे वृत्त ‘लोकसत्ता, ठाणे’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी ही भेट देऊन अधिकाऱ्यांना कामे जलद गतीने मार्गी लावण्याचे आदेश दिले. रविवारी दुपारच्या सुमारास पालकमंत्री िशदे यांनी खासदार विचारे यांच्यासह ठाणे स्थानकात अकस्मात भेट दिली. या वेळी त्यांना जागोजागी बांधकाम साहित्याचे ढीग आढळून आले. कामे लवकर उरका आणि निधीची अडचण असेल तर किमान बांधकाम साहित्याचे ढीग तरी उचला, या शब्दात यांवेळी पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. गर्दीच्या वेळी प्रवाशांची लोकल पकडण्यासाठी धावपळ सुरू असताना ही अडथळ्यांची शर्यत कशासाठी, असा सवालही त्यांनी केला. पालकमंत्र्यांच्या या भेटीनंतर बांधकामाचा कचरा तातडीने उचलला जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.