अवाजवी देयकांमुळे ग्राहक हवालदिल; रक्कम कमी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यतील महावितरण कार्यालयांमध्ये गर्दी

ठाणे/कल्याण : टाळेबंदीच्या काळात वीजबिलांच्या वसुलीसाठी तगादा न लावून ग्राहकांना दिलासा देणाऱ्या महावितरणने जूनमध्ये, मात्र नागरिकांवर अवाच्या सवा वीजदेयकांचा ‘बॉम्ब’ टाकला आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांतील देयकांचा आढावा घेऊन जून महिन्यात अचानक वाढीव बिले महावितरणने ग्राहकांना पाठवली आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांत ही परिस्थिती असून बिलाची रक्कम कमी करण्यासाठी ग्राहक महावितरणच्या कार्यालयात गर्दी करू लागले आहेत.

टाळेबंदीच्या काळात करोना संसर्गाच्या भीतीने ठाणे जिल्ह्यात महावितरणकडून घरोघरी जाऊन मीटर रीडिंग घेण्याचे काम बंद करण्यात आले होते. या काळात ग्राहकांना त्यांच्या वापरानुसार महावितरणकडून सरासरी देयके पाठण्यात येत होती. तर काही ग्राहकांनाही त्यांच्या मीटरमधील चालू महिन्याच्या रीडिंगची माहिती महावितरणाला पाठवत वीज देयकांचा भरणा केला होता. अशाप्रकारे टाळेबंदीच्या कालावधीतही शहरातील हजारो ग्राहक नियमित ऑनलाइन वीज देयके भरत होती. असे असताना ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई आणि शहरापूर शहरातील ग्राहकांना महावितरणने जून महिन्यात मोठय़ा रकमेची वीज देयके पाठवली असून एक हजार ते बाराशे रुपये देयक भरणाऱ्या वीज ग्राहकाला चार ते पाच हजार रुपयांची बिले पाठविण्यात आल्याने हा आकार समजून घेण्यासाठी वीज मंडळाच्या कार्यालयांमध्ये ग्राहक गर्दी करू लागले आहेत.

 राजकीय पक्ष आक्रमक

महावितरण प्रशासन गेल्या काही वर्षांपासून तोटय़ात असून हा तोटा भरून काढण्यासाठी वीज देयक हे साधन नाही, असा प्रश्न करत मनसेच्या कल्याणमधील पदाधिकाऱ्यांनी सोमवारी महावितरणाच्या कल्याण मुख्यालयावर धडक मारली. डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण, कल्याणचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, नगरसेवक राजेंद्र देवळेकर, कुणाल पाटील यांनी चढय़ा दराची सरासरी देयक तातडीने कमी करण्याची मागणी महावितरणकडे केली. करोना संसर्गाने रहिवासी हैराण असून त्यांना चढय़ा दराची सरासरी देयक पाठवून महावितरणाने मनस्ताप देऊ नये, असे या आमदारांनी महावितरण अधिकाऱ्यांना सुनावले आहे. तर भाजपने चढय़ा दराच्या वीज देयकांची होळी करण्याच्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

महावितरणचे स्पष्टीकरण

टाळेबंदीदरम्यान मीटर रीडिंग बंद असल्याने ग्राहकांना सरासरी वीजदेयके पाठवण्यात आली. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर १ जूनपासून स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागात मीटर रीडिंग घेण्यात सुरुवात करण्यात आली. मीटर रीडिंग प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर वीजग्राहकांना टाळेबंदीच्या कालावधीतील एप्रिल आणि मे महिन्यासह जून महिन्याचे वीज देयक एकत्रित पाठविण्यात येत आहेत. तीन महिन्यांचे एकत्रित देण्यात आलेली वीज देयके योग्य आणि अचूक असून त्यामध्ये कोणत्याही प्रकाराचा अतिरिक्त भरुदड लावण्यात आलेला नाही, अशी माहिती महावितरणाच्या भांडुप परिमंडळातर्फे देण्यात आली आहे.

वीजबिलाचे विश्लेषण

ग्राहकांनी वीज देयकांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये. तसेच करोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर वीज देयके दुरुस्तीसाठी कार्यालयांत गर्दी करू नये, असे आवाहन महावितरणाने केले आहे. दरम्यान, दोन ते तीन महिन्यांच्या एकत्रित वीज देयकांची माहिती घेण्यासाठी तसेच स्लॅब बेनिफिट, भरलेल्या रकमेचे समायोजन, मासिक वीजवापर आणि स्लॅबप्रमाणे लावलेला वीजदर याची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी  https://billcal.mahadiscom.in/consumerbill महावितरणने वीजग्राहकांसाठी ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. केवळ ग्राहक क्रमांक टाकून या लिंकद्वारे वीजबिलाचा संपूर्ण हिशोब आणि महावितरणकडून करण्यात आलेले ग्राहकांना वीज देयकांचे विश्लेषण या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.