पारनाका येथील महावितरण कार्यालयाची मोडतोड

आधीच उकाडय़ाने हैराण झालेल्या कल्याण पश्चिमेत सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच मंगळवारी मध्यरात्री पुन्हा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी रात्री रास्ता रोको करत महावितरणच्या कार्यालयाची मोडतोड केली.

कल्याण पश्चिमेत मध्यरात्री दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे वायलेनगर, गांधारेनगर, लालचौकी, गोल्डन पार्क, आधारवाडी, सुभाषनगर, श्री कॉम्प्लेक्स, रामबाग हे परिसर अंधारात बुडतात. मध्यरात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मंगळवारी रात्री ११.३०च्या सुमारास वीजपुरवठा पुन्हा खंडित झाल्याने त्यांच्या संतापाला पारावार राहिला नाही. बराच वेळ होऊनही वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्याने नागरिकांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी रात्री लालचौकी परिसरात रास्ता रोको केला, तर काहींनी पारनाका येथील महावितरणच्या कार्यालयाकडे मोर्चा वळविला. यावेळी तेथे एकही कर्मचारी उपस्थित नसताना येथील वीज आणि पंखे मात्र सुरू होते. हे पाहून नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी कार्यालयाची मोडतोड केली. दरम्यान, पहाटे ३.३०च्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला.

जम्पिंग तुटल्याचे कारण

याविषयी महावितरणशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, जम्पिंग तुटल्याने वीजपुरवठा खंडीत होत होता. मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलाचे काम सुरु असल्याने अवजड वाहनांची वाहतूक कल्याण शहरातून वळविण्यात आली आहे. या दरम्यान एका वाहनामुळे केबलची वायर तुटून ती महावितरणच्या वीज वाहिनीवर पडली. यामुळे टाटा वाहिनीवरील जम्प तुटला यामुळे वीजपुरवठा खंडित होता.