भाजप, शिवसेनेकडून प्रस्ताव येण्याची प्रतीक्षा

कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेना-भाजपमधील कुरबुरी लक्षात घेता या दोन पक्षांपैकी कुणीतरी युतीसाठी हात पुढे करेल, अशी अपेक्षा मनसेच्या गोटात व्यक्त होत होती. मात्र, तशी चिन्हे दिसत नसल्याने १२२ प्रभागांमध्ये स्वबळावर उमेदवार उभे करण्याची तयारी मनसेने सुरू केली आहे. येत्या पंधरा दिवसांत सन्मानाने कोणी टाळी देण्यासाठी हात पुढे केला तर त्याचाही विचार करण्यात येईल, असे मनसेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

शहरात मनसेविषयी काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी मनसेचा मुंबईतील एक नेता गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत खासगी भेटीगाठी घेत आहे. गेल्या वेळच्या पालिका निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. या नगरसेवकांनी भरीव अशी कामगिरी पालिकेत करून दाखविली नसल्याचे नागरिकांचे मत झाले आहे. लोकांमधील हा नाराजीचा सूर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कसा दूर करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. येत्या ७ तारखेला राज ठाकरे शहरात येत आहेत. ‘झाले गेले विसरून जा, राजकीय परिपक्वते अभावी काही गोष्टी घडून गेल्या आहेत. नव्याने नव्या दिशेकडे पाहू आणि वाटचाल करू,’ अशी आळवणी मनसे नेत्यांकडून शहरवासीयांना करण्यात येणार असल्याचे मनसेच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले.