सूचना फलक, मार्गिका पट्टय़ांचे काम अर्धवट

घोडबंदर मार्गावरील अवजड वाहतूक डाव्या बाजूने सुरू राहावी आणि वाहतूककोंडीची समस्या सुटावी यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाहतूक नियमांसंबंधीचे फलक लावावेत आणि मार्गिकापट्टय़ा अधोरेखित कराव्यात, अशी सूचना ठाणे वाहतूक पोलिसांनी केली आहे, मात्र एमएसआरडीसीने या सूचनांकडे दुर्लक्ष केले आहे, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, एमएसआरडीसीनेही वाहतूक पोलिसांकडून असे पत्र आल्याचे मान्य केले आहे.

घोडबंदर मार्गावर ट्रक आणि अवजड वाहने मनमानी पद्धतीने चालवली जातात. अवजड वाहने महामार्गाच्या डाव्या बाजूने चालवण्यात यावीत, हा नियम चालकांकडून पायदळी तुडविला जातो. त्यामुळे या मार्गावर वारंवार कोंडी होते. याला महामार्गाचे कामकाज पाहणारी यंत्रणा जबाबदार असल्याचा दावा वाहतूक विभागाकडून करण्यात आला आहे. ट्रक आणि अवजड वाहनांच्या चालकांनी महामार्गावर डाव्या बाजूने वाहने चालवावीत. तसेच उजव्या आणि मधल्या मार्गिकेवरून कार आणि इतर वाहने चालविण्यात यावीत अशा सूचनेचे फलक लावण्याची मागणी वाहतूक पोलिसांनी एमएसआरडीसीकडे अनेकदा पत्राद्वारे केली आहे. मात्र, या विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. अवजड वाहनांच्या चालकांना डाव्या बाजूने वाहने नेण्यास सांगण्यात येते. मात्र, या मार्गिकेवरून रिक्षा आणि दुचाकी वाहतूक सुरू असते.त्यामुळे तेथून अवजड वाहने चालविणे शक्य नसते, असे चालकांकडून सांगण्यात येते, अशी माहिती वाहतूक पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पालकमंत्रीही अनभिज्ञ

ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे रस्ते विकास महामंडळाचे मंत्री आहेत. घोडबंदरसह ठाणे जिल्ह्य़ातील विविध मार्गावर उन्नत मार्ग उभारण्यासाठी पालकमंत्री नेहमीच आग्रही असतात, मात्र िशदे यांच्या अखत्यारित येणारा विभाग वाहतूक पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असूनही पालकमंत्र्यांनी अद्याप कठोर भूमिका न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एमएसआरडीसी काय म्हणते?

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर परिसरात घाटाच्या भागात वाहतूक नियमांसंबंधी फलक लावण्यात आले आहेत. अन्य ठिकाणी अवजड वाहनांच्या मार्गिकेबाबतचे फलक लावण्यात आलेले नाहीत. घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांची मार्गिका दाखविण्यासाठी रंगकाम करण्यासंबंधीचे पत्र वाहतूक विभागाने दिले आहे. मात्र, या मार्गावरील काही भागांत डांबरीकरण सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर अवजड मार्गिकेसाठी रंगकाम करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध बोराडे यांनी सांगितले.