गळके छप्पर, नादुरुस्त पंखे आणि दुर्गंधी  

कित्येक तास रस्त्यावर गाडी चालवून थकलेल्या एस.टी. चालक आणि वाहकांना विश्रांती मिळावी, या हेतूने बांधण्यात आलेले राज्य परिवहन महामंडळाचे ठाण्यातील विश्रांतीगृह म्हणजे अनेक असुविधांचे आगार आहे. खोपट येथील मध्यवर्ती एस.टी. आगारातील हे विश्रांतीगृह म्हणजे एस.टी. कर्मचाऱ्यांना सोसाव्या लागणाऱ्या यातनांचे प्रतीकच आहे. गळके छप्पर, अस्वच्छ शौचालय, नादुरुस्त पंखे, १६ पैकी अवघ्या तीन टय़ूब लागत असल्याने येथे सदैव काळोख पसरलेला असतो.

विश्रांतीगृहाच्या पहिल्या पायरीपासूनच अस्वच्छता आपले स्वागत करते. थकूनभागून आल्यावर चालक-वाहकांना झोपण्यासाठी हा कक्ष असला तरी त्यासाठी आवश्यक असणारे खाटा, अंथरूणे अशी कोणतीही व्यवस्था इथे नाही. त्यामुळे दमून आलेले चालक-वाहक फरशीवरच आपले अंग टाकतात. येथील स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य आहे. टाक्यांमधील पाणी गळत असल्याने इथे सदैव ओलसरपणा असतो.

विश्रांतीगृहात वायुविजनासाठी बसविण्यात आलेले पंखे जीर्ण झाले आहेत. धुळीने भरलेले हे पंखे केविलवाण्या पद्धतीने फिरत असल्याने विश्रामगृहातील घुसमट जराही कमी होत नाही. त्यातील काही पंखे नादुरुस्त असून ते दुरुस्त करण्याची तसदी कुणीही घेतलेली नाही. या कक्षातील प्रकाशव्यवस्थाही अपुरी आहे. या अव्यवस्थेविषयी एस.टी. महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी एस.तांबोळी यांना विचारले असता, त्यांनी चौकशी करून माहिती घेऊ, असे उत्तर दिले.

स्वच्छता मोहीम कागदावरच..

गांधी जयंतीनिमित्ताने २ ऑक्टोबरला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ‘संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पा’चा शुभारंभ केला. या प्रकल्पांतर्गत प्रवाशांच्या सेवेसाठी सर्व एस.टी बसगाडय़ा, कार्यालये, चालक-वाहक विश्रांतीगृहे, प्रसाधनगृहे स्वच्छ करण्यात येणार आहेत. ही योजना डिसेंबरअखेपर्यंत सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च करून या स्वच्छतेसाठी एका संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. मात्र ठाण्यातील कोणत्याही बस आगारापर्यंत ही स्वच्छता मोहीम अद्याप पोहोचलेली दिसत नाही.