प्रजासत्ताक दिनी एस.टी. प्रेमींकडून ठाण्यात प्रदर्शन; छायाचित्रे, पुठ्ठय़ांच्या कलाकृतींची मांडणी
गाव तिथे एस.टी. हा महाराष्ट्र राज्य परिवहनचा लौकिक आता राहिला नसला तरी अनेक ठिकाणी अजूनही एस.टी.शिवाय पर्याय नाही. या कंटाळवाण्या आणि काहीशा त्रायदायक प्रवासातही आनंद शोधण्याचा प्रयत्न काहीजणांनी करून चार वर्षांपूर्वी ‘एमएसआरटीसी लव्हर्स’ ही संस्था स्थापन केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन अखंडपणे सेवा देणाऱ्या एसटीबद्दल नागरिकांनीही जाणून घ्यावे यासाठी या एसटी लव्हर्स ग्रुपने प्रजासत्ताकदिनी ‘एसटीविश्व हे आगळे वेगळे’ प्रदर्शन ठाणे खोपट येथे भरवले होते.
या एस.टी. प्रेमी समूहात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील ५०० जणांचा समावेश आहे. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात हे सर्वजण एकदा भेटतात आणि संमेलन भरवितात. विशेष म्हणजे या समूहामध्ये अभियंते, वैद्यकीय व्यावसायिक, वास्तूरचनाकार आदींचा समावेश आहे. काहीजणांना एसटीमधून फिरण्यापेक्षा त्यांची चित्रे रेखाटायला आवडते तर काहीजण एसटीची वेग़ळेगळी छायाचित्रे काढतात. पुठ्ठे व पत्र्यांनी एसटीच्या प्रतिकृती तयार करतात. संमेलनस्थळी भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनामध्ये विविध एसटी स्थानकातील एसटी बसेसची छायाचित्रे, प्रतिकृती, चित्रे, जुनी तिकीटे, आरक्षणे, पासेस, प्रवाशांच्या सोयीसाठी झालेल्या गाडय़ांमधील बदल,एस.टीच्या नवीन योजना,सवलती,नव्या मार्गावर सुरू झालेल्या बसेस, दिवा़ळी-गणपती, जत्रांसाठी सोडण्यात येणाऱ्या गाडय़ा आदी तपशील असतो. एसटी संबंधीची माहिती या एस.टी प्रेमींनी आपली आवड म्हणून गोळा केली आणि छंद म्हणून जोपासली आहे. ठाण्यात प्रथमच हे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

असे भरविले प्रदर्शन..
रोहित धेंडे हा ठाण्यात राहणारा एसटी प्रेमी आहे. परंतु शिक्षणानिमित्त तो पुण्यात राहतो. मात्र पुणा-ठाणे प्रवास करतांना त्याने स्वखर्चाने एक एस.टी रंगवली,त्या एसटीवर एसटीच्या प्रवासाची व योजनांची माहिती त्याने लिहली. फक्त एसटी संमेलनाच्यावेळीच हे प्रदर्शन न दिसता ते सामान्यांपर्यंत पोहचवावे असे रोहितला सुचले आणि त्याने एसटीप्रेमी मित्रांना सांगितले.सर्वांनाच त्याची कल्पना आवडल्याने ठाण्यात प्रदशऱ्न भरविण्यात आले. या प्रदर्शनाला एक हजारांहून अधिक लोकांनी भेट देऊन या सर्वाचे कौतुक केले.