जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात एकही रुग्ण नसल्याने दिलासा

ठाणे : जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असला तरी म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांमध्ये दररोज सरासरी दहापेक्षा अधिक रुग्ण या आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर आतापर्यंत या आजाराने ग्रस्त असलेले ११७ रुग्ण आढळले असून त्यापैकी दहा जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व रुग्ण महापालिका क्षेत्रात सापडले असून ग्रामीण भागात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

करोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लागण होत आहे. मधुमेह, कर्करोग रुग्ण तसेच रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना या आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते. या रुग्णांना वेळीच उपचार मिळाले नाही तर डोळ्यांवाटे हा संसर्ग मेंदूमध्ये जाऊन रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी जिल्हा तसेच महापालिका यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्य़ात आतापर्यंत ११७ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत. सर्व रुग्ण शहरी भागातील असून ग्रामीण भागांत मात्र या आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. ११७ पैकी तीन रुग्णांना मुंबईतील रुग्णालयांत हलविण्यात आले आहे. उर्वरित बहुतेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्य़ात आतापर्यंत दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ठाणे शहरात १, नवी मुंबईत ५, कल्याण-डोंबिवलीमधील ३ आणि उल्हासनगरमधील एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.

रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे पथक सज्ज करण्यात आले आहे. त्यामध्ये भूलतज्ज्ञ, कान, नाक, घसा आणि दंतचिकित्सकांचा समावेश आहे. याशिवाय, न्युरो सर्जनसह इतर तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दिली.

इंजेक्शनसाठी वणवण

जिल्ह्य़ातील खासगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण उपचार घेत आहेत. अशा रुग्णांच्या उपचारासाठी अ‍ॅम्फोटेरेसीन हे इंजेक्शन वापरले जात असून हे इंजेक्शन आणण्यासाठी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना चिठ्ठी लिहून दिली जात आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयामधून रुग्णांना या इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येतो. याबाबत खासगी रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्ण नातेवाईकांना फारशी माहिती दिली जात नाही, अशा तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे इंजेक्शनच्या शोधात नातेवाईक वणवण फिरत असल्याचे चित्र आहे. या संदर्भात ठाण्याचे शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी सांगितले, जिल्हा रुग्णालयातून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून दिले जातात. त्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक असते, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील       रुग्ण

एकूण रुग्ण         ११७

ठाणे                    ४०

नवी मुंबई             ३४

कल्याण             २९

उल्हासनगर          ३

भिवंडी                  १

मीरा-भाईंदर          ८

अंबरनाथ              १

बदलापूर                १