बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणातील चारही नगरसेवकांपैकी नजीब मुल्ला यांना ठाणे कारागृहात भेटण्यास राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना तुरुंगाधिकाऱ्यांनी अटकाव केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुल्ला हे आव्हाड यांचे अत्यंत निकटचे सहकारी मानले जातात. म्हणूनच त्यांची भेट घेण्यासाठी आव्हाड हे तेथे गेले होते. मात्र कारागृहाच्या नियमांचा त्यांच्या भेटीस ‘अडसर’ आल्याचे सूत्रांनी सांगितले. सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ठाणे पोलिसांना सापडली होती. त्यामध्ये नगरसेवक हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण या चौघांची नावे पुढे आली होती. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी चौघांना अटक केली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार नऊ दिवस पोलीस कोठडीत ठेवले. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी न्यायालयाने चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने या चौघांचे जामीन अर्जही नामंजूर केल्याने गेल्या दहा दिवसांपासून हे चौघे ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चौघांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते कारागृहात येत आहेत. या चौघांच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त अन्य कोणालाही त्यांच्याशी भेटू दिले जात नाही.
कारागृहासाठी लागू असलेल्या नियमांच्या आधारे कार्यकर्त्यांना ही भेट नाकारण्यात येत आहे. या कार्यकर्त्यांप्रमाणेच ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे नजीब मुल्ला यांच्यासह चौघांना भेटण्यासाठी कारागृहात गेले होते, मात्र अन्य कार्यकर्त्यांप्रमाणेच त्यांनाही प्रशासनाने चौघांना भेटण्यास नकार दिला आहे. या चौघांना भेटायचे असेल तर न्यायालयातून आदेश घेऊन या, असे कारागृह प्रशासनाकडून त्यांना या वेळी सांगण्यात आले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

कच्चे कैदीच..
कारागृहातील अंडा सेलमध्ये आरोपी नगरसेवक हणमंत जगदाळे, विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला आणि सुधाकर चव्हाण या चौघांना ठेवण्यात आले आहे. हा सेल एका बाजूला असल्याने तिथे अन्य कुणाशी बोलणेही शक्य होत नाही. या चौघांना बाहेरच्या जेवणाचा डबा देण्यास प्रशासन तयार नाही. त्यामुळे कारागृहामध्ये कैद्यांसाठी जेवण तयार करण्यात येते तेच जेवण या चौघांना देण्यात येते. झोपण्यासाठी सतरंजी, चादर आणि उशी इतके साहित्य देण्यात आले आहे.
मुल्ला यांच्या भेटीस गेलो आणि आपल्याला त्यांना भेटू दिले नाही, असा काही प्रकारच घडलेला नाही. त्यांच्या भेटीसाठी आपण कधीही कारागृहात गेलो नाही.
-जीतेंद्र आव्हाड, आमदार