सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंकडून ठाणे जकात नाक्याची पाहणी

मुलुंड हद्दीवरील टोलनाक्याच्या परिसरात होणारी वाहतूक कोंडी आणि कोपरी पुलाच्या कामामुळे नागरिकांची होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी पुलाच्या अलीकडे असलेल्या ठाणे जकात नाक्यावर  लागून असलेल्या नाल्यावर स्लॅब टाकून तेथून वाहतूक वळवण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात केली.

टोलनाक्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या नाल्यांवर स्लॅब टाकल्यास नागरिकांना वाहतूकीसाठी वाढीव मार्गिका उपलब्ध होईल आणि त्यामुळे टोलनाका परिसरात वारंवार होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे शिंदे म्हणाले.

कोपरी येथील रेल्वेवरील पुलाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होत असल्याने पूर्व द्रुतगती महामार्गाच्या तुलनेत हा पूल अरुंद असल्याने दिवसा आणि रात्री गर्दीच्या वेळी येथे वाहतूक कोंडी होते. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शिंदे यांनी या परिसराची पाहणी केली.

ठाणे जकात नाक्याच्या जागेला लागून असलेल्या नाल्यावर स्लॅब टाकून त्या रस्त्यामार्गे वागळे इस्टेट, लोकमान्य नगर या भागात वाहतूक फिरवता येणे शक्य आहे. तसेच गर्दीच्या वेळेस कोपरी पुलामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन सायंकाळी संपूर्ण कोपरी पुलावरील वाहतूक ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीसाठी खुली ठेवून मुंबईकडे जाणारी वाहतूक १२ बंगला मार्गे वळवून कोपरी पुलावर एक दिशा मार्ग करता येऊ शकतो, असा प्रस्तावही यावेळी मांडण्यात आला.  यावेळी रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, मुख्य अभियंता अनिल गायकवाड, एमईपीचे जयंत म्हैसकर, तसेच ठाणे महापालिका आणि एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संख्या वाढीवर भर

गुरुद्वारा येथील सेवा रस्त्याच्या मध्यभागी उतरणारा पादचारी पूल रस्त्याच्या शेवटपर्यंत वाढवून सेवा रस्ता मोकळा करणे, अशा अनेक उपायांचा समावेश करण्यात आला. टोलनाक्यांवर मनुष्यबळ वाढवणे, येथे असलेल्या यंत्रांची संख्या वाढवणे, वाहतूक सेवकांची नियुक्ती हे उपायही करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.