News Flash

मुलुंड टोलनाका प्रशस्त होणार?

मुलुंड येथील टोलनाक्यावरून ठाणे, कल्याण, नाशिक, घोडबंदर येथून लाखो वाहने मुंबईत ये-जा करत असतात.

|| किशोर कोकणे

जकातनाक्याची जागा घेऊन विस्ताराची योजना; अतिरिक्त मार्गिकांमुळे वाहतूककोंडी थांबण्याची चिन्हे

ठाणे : ठाणे-मुंबईच्या वेशीवरील मुलुंड टोलनाक्यावर दररोज होणारी वाहतूककोंडी सुटावी, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या टोलनाक्याला लागूनच असलेल्या जकातनाक्याची जागा भाडेतत्त्वाने घेण्यासाठी महामंडळाने मुंबई महापालिकेला पत्र पाठवले असून पालिकेची मंजुरी मिळाल्यानंतर हा टोलनाका जकातनाका येथे हलवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे टोलनाका प्रशस्त होणार असून अतिरिक्त मार्गिकाही उपलब्ध होतील व येथे दररोज होणारी वाहतूक कोंडी टाळता येईल, असा महामंडळाचा दावा आहे.

मुलुंड येथील टोलनाक्यावरून ठाणे, कल्याण, नाशिक, घोडबंदर येथून लाखो वाहने मुंबईत ये-जा करत असतात. ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग आनंदनगर जकातनाक्यापुढे अरुंद होतो. त्यामुळे मुलुंड येथील टोलवसुलीदरम्यान दररोज सकाळी टोलनाक्यावर वाहतूक कोंडी होत असते. अनेकदा वाहनांच्या रांगा ठाण्यातील कोपरी रेल्वे पुलापर्यंत येत असतात. कोपरी रेल्वे पुलाचेही काम सुरू असल्याने ही कोंडी पुढे वाढत जाते. फास्टॅग असलेली वाहनेही यामुळे वाहतूक कोंडीत अडकून राहतात. यातून मार्ग निघावा यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वेगवेगळ्या उपायांवर चर्चा घडवून आणली होती. मुंबई महानगरपालिकेचा बंद अवस्थेत असलेला जकातनाक्याची जागा भाडेतत्त्वावर घेऊन या ठिकाणी टोलनाक्याचे स्थलांतर करावे आणि अतिरिक्त मार्गिका उपलब्ध करून घ्याव्यात, असा विचारही या बैठकांदरम्यान पुढे आला होता. त्यानुसार एमएसआरडीसीने मुंबई महापालिकेच्या आनंदनगर जकातनाका येथील जागा भाडेतत्त्वावर मिळविण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेला पत्रव्यवहार केला आहे.

मुंबई महापालिकेनेही याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कळते आहे. करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे ही प्रक्रिया सध्या लांबणीला पडली आहे. मात्र या जागेसाठी मान्यता मिळाल्यास आणखी अतिरिक्त पाच ते सहा मार्गिका वाहनचालकांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे टोलनाक्यावर होणारी वाहतूक कोंडी टळण्याची शक्यताही आहे.

मुलुंड टोलनाक्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी सकाळी पाच मार्गिका उपलब्ध असतात. मात्र वाहनांचा भार लक्षात घेता या मार्गिका अपुऱ्या पडत आहेत. टोलनाका आनंदनगर जकातनाका येथे हलविण्याचा विचार एमएसआरडीसीचा आहे. त्यामुळे अतिरिक्त आणि प्रशस्त मार्गिका उपलब्ध होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुलुंड टोलनाका येथे होणारी वाहनकोंडी सुटावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या पर्यायांवर राज्य सरकारकडून विचार सुरू आहे. मुंबई महापालिकेला जकातनाक्याची जागा मिळाल्यास टोलनाक्यावर अतिरिक्त मार्गिका उपलब्ध होऊ शकतील आणि कोंडी टळेल. कोपरी पुलाचे कामही वेगाने सुरू असून टोलनाक्याचे स्थलांतर झाल्यास महामार्गावरील प्रवास सुसह्य होईल. – एकनाथ शिंदे, पालकमंत्री ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:03 am

Web Title: mulund tolnaka will be spacious akp 94
Next Stories
1 टाळेबंदीत ग्रामीण अर्थव्यवस्थेला अंशत: दिलासा
2 रुग्ण-नातेवाईकांचा संवाद घडवा
3 ‘वेदांत’मधील मृत्यू प्राणवायूअभावी नव्हे!
Just Now!
X