मुंबई-अहमदाबाद महामार्गावर माती आणि डेब्रिजचे ढिगारे; अपघातांची शक्यता

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर पासून ससूननवघर , वसईपर्यंत रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तींकडून बांधकामानंतर वापरेले साहित्य (डेब्रीज) आणि माती टाकण्याचे प्रकार सुरू आहे. त्यातच पावसाळा सुरु असल्याने चिखल होऊन महामार्ग निसरडा बनत आहे. या महामागर्गावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्ग प्राधिकरणाने याची गंभीर दखल घेतली असून असे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्राधिकरणाने सांगितले आहे.

मुंबई आणि गुजराथ तसेच उत्तरेकडील राज्यांना जोडणारा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ हा महत्वाचा मार्ग मानला जातो. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर कडेला जागोजागी मातीचे ढिगारे, ‘डेब्रीज’ टाकण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. गुजरात दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर घोडबंदर पासून ससूननवघर ,वसईपर्यंत मातीचे ढिगारे रात्रीच्या वेळी टाकले जात आहेत.

ही माती, डेब्रीज कोण टाकतं ते समजू शकलेले नाही. रात्रीच्या वेळी अज्ञातांकडून ही माती टाकली जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले. माती टाकल्याने या महामार्गाला कचराभूमीचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. या परिसरात माती उत्खननाचे प्रकारही होत असतात.

ढिगाऱ्यांमुळे वाहनचालकांना धोका निर्माण झाला असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान बेकायदा माती आणि ‘डेब्रीज’ टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे  रात्री महामार्गावर बेकायदा माती आणि ‘डेब्रीज’ टाकणाऱ्यांवर कारवाई कधी होणार हा सवाल उपस्थित होत आहे.

सध्या महामार्ग प्राधिकरणाचे भालिवली वगळता कुठेही काम सुरू नाही. त्यामुळे ही माती आमची नाही. आम्ही ते डेब्रीज हटविण्याचे आदेश दिले आहेत. या मागे कोण आहे आणि हा नेमका काय प्रकार आहे त्याचा आम्ही तपास करत आहोत. हा निश्चित गंभीर प्रकार असून याबाबत दोन दिवसात निर्णय झाला नाही तर वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात येईल. शशी भूषण, प्रकल्प संचालक, महामार्ग