प्रियकरावरचा बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने ब्लॅकमेल करत बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरूणीने केला आहे. या प्रकरणी पीडित तरूणीने भिवंडीतील कोन गाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलीस उप निरीक्षक रोहन गोंजारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ते भिवंडी येथील शांती नगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत अशीही माहिती समोर आली आहे.

पीडित तरूणी मुंबई येथील राहणारी आहे. तिची काकू भिवंडीत राहते, पीडित तरूणी काकूच्या घरी सुट्टीत जात असे. त्यावेळी सतीश नक्कलवार नावाच्या तरूणाशी तिचं सूत जुळलं. २०१५ पासून या दोघांचे प्रेमसंबंध होते. खरेतर सतीश नक्कलवार हा विवाहित आहे, त्याला दोन मुलेही आहेत. हे माहिती असूनही या दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते. या दोघांचे प्रेमप्रकरण आहे याची कुणकुण सतीशची पहिली प्रेयसी राबियाला लागली. तिने पीडित तरूणीला फोन करून सतीशचे आणि तिचे प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. तसेच सतीशचा पिच्छा सोड अशीही धमकी दिली. तरीही ही तरूणी सतीशला भेटत राहिली. तसेच या दोघांमध्ये शरीरसंबंधही प्रस्थापित झाले. ही बाब राबियाला समजली.

त्यानंतर राबियाने सतीशसोबत प्रेमसंबंध तोडण्यास पुन्हा सांगितले. तसेच घरच्यांना सगळे प्रकरण सांगेन अशीही धमकी तिने दिली. त्यानंतर माझं आणि सतीशचं भांडण झालं आणि तू माझ्या घरी येऊ नकोस तसंच माझ्याशी कोणतंही नातं ठेवू नकोस असंही सतीशला मी बजावल्याचंही या तरूणीने म्हटलं आहे. पण सतीशला असे सांगितल्यानंतर मी तुझ्या घरी येऊन सगळं प्रकरण सांगेन अशी धमकी त्याने मला दिली त्यामुळे मी घाबरले असेही या तरूणीने म्हटले आहे.

या काळात राबियाने आपल्याला घरी बोलावलं आणि गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर सलीम नावाच्या तरूणाकडून बलात्कार करून घेतला आणि त्याचे चित्रीकरण मोबाइलमध्ये केले. दुसऱ्या दिवशी राबियाने हा व्हिडीओ मला दाखवला आणि ब्लॅकमेल करत ५० हजार रुपयांची मागणी केली. घाबरून पीडित तरूणीने तिला ४३ हजार रुपये दिली. तरीही धमक्या येणे सुरुच होते. त्यामुळे पीडित तरूणीने कुलाबा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी झीरो एफआयआर दाखल करत राबिया, पीडित तरूणीचा प्रियकर सतीश आणि सलीम या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. एबीपी माझाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मात्र बलात्काराच्या घटनेला या तरूणीनेच कलाटणी दिली. सतीश हा माझा प्रियकर असून मी त्याच्याशी सहमतीने शरीर संबंध ठेवले असल्याचे या तरूणीने सांगितले. सतीशवरचा बलात्काराचा गुन्हा मागे घ्या असा तगादा तिने भिवंडी पोलिसांकडे लावला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर शांतीनगर पोलिसांनी या तिघांना अटक करून त्यांना गजाआड केले. पीडित तरूणीने कोर्टासमोरही सतीशने बलात्कार केला नाही तर त्याच्याशी सहमतीने शरीर संबंध ठेवल्याचे सांगितले.

याच गुन्ह्यातील तपास अधिकारी रोहन गोंजारी यांनी खोटा गुन्हा दाखल केला म्हणून कारवाई करण्याची धमकी पीडित तरूणीला दिली. तसेच तुझ्या प्रियकराला सोडवायचं असेल तर माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव असं सांगून ब्लॅकमेल केल्याचा आरोप या तरूणीने दिला आहे. एवढंच नाही तर पोलीस उप निरीक्षक रोहन गोंजारी यांनी आपल्याला रांजणोली नाक्यावर बोलावले आणि त्यासमोर असलेल्या कल्याण गेस्ट हाऊस या लॉजवर नेऊन बलात्कार केला असाही आरोप या तरूणीने केला आहे. रोहन गोंजारींवर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी असेही या पीडित तरूणीने म्हटले आहे.