|| सुहास बिऱ्हाडे

अटकेतील तरुणाच्या चौकशीतून माहिती उघडकीस

लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणे जिवावर बेतणारे असले तरी त्याचे प्रमाण कमी होत नाही. असे स्टंटबाज करणारे पोलिसांची डोकेदुखी ठरले आहे. मात्र रेल्वे लोकलमध्ये केली जाणारी स्टंटबाजी मौज म्हणून नाही तर पैसे कमावण्यासाठी केली जाते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहेत. नालासोपारा रेल्वे पोलिसांनी नुकत्याच अटक केलेल्या एका स्टंटबाज तरुणांच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे.

यू टय़ूब आणि टिक टॉक या संकेतस्थळावर नुकत्याच एका तरुणाचा स्टंटबाजी करणारी चित्रफीत प्रसारित झाली होती. त्यात हा तरुण जीवघेणा स्टंट करत असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरू केला. मोठय़ा प्रयत्नांनंतर या तरुणाला नालासोपारा येथून अटक करण्यात आली. जावेद  खान (२०) असे या तरुणाचे नाव आहे. सुरुवातीला तो मौजमजा किंवा गंमत म्हणून असे साहस करत असेल, असे वाटत होते. मात्र त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आले. अशा साहसी स्टंटबाजी करणाऱ्या चित्रफिती समाजमाध्यमावर टाकल्या की पैसे मिळतात म्हणून तो हे साहस करत होता, असे पोलिसांनी सांगितले.

स्टंटबाजीच्या चित्रफिती खूप प्रसारित होतात. त्याला देश-विदेशातून लाइक्स मिळतात. त्यामुळे अशा चित्रफितींमध्ये जाहिराती केल्या जातात. त्यासाठी कंपन्यांकडून पैसे मिळतात. असे स्टंटबाजी करणाऱ्या चित्रफिती टाकून पैसे मिळवण्याचा नवीन मार्ग तयार झाला आहे. समाजमाध्यमांवर एखाद्या वापरकर्त्यांला किती फॉलोअर्स आहेत, किती लाइक्स आहेत ते पाहिले जाते. हजारांच्या वर लाइक्स मिळाल्यास काही कंपन्या लाइक मागे एक रुपयांप्रमाणे पैसे देत असतात. अ‍ॅप बनवणाऱ्या कंपन्या तर समाजमाध्यमावर अधिक फॉलोअर्स असणाऱ्यांना नियुक्तीही करत असतात, असे या तरुणाने सांगितले.

आपल्या स्ंटटबाजीला जास्तीत जास्त लाइक्स मिळावे आणि त्यातून पैसे मिळावे यासाठी तरुण अशा धोक्याचा मार्ग पत्करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा स्टंटबाज तरुणांचे समुपदेशन करून त्यांना या मार्गापासून परावृत्त केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या जावेद खानला न्यायालयाने ८०० रुपयांचा दंड आकारला असून त्याची रवानगी १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत केली आहे.