News Flash

कमाल झाली! लोकलमधून हरवलेली १ लाख रुपयांनी भरलेली बॅग तासाभरात सापडली

नागेश यांनी दादरहून विरारला जाण्यासाठी ट्रेन पकडली. नागेश सावंत विरारला राहणाऱ्या आपल्या भावाकडे चालले होते.

मुंबईत लोकल प्रवासात चोरी होणाऱ्या तसेच हरवणाऱ्या वस्तू सहसा सापडत नाहीत. पण ट्रॉम्बे येथे राहणारे नागेश सावंत नशीबवान ठरले. त्यांची १ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हरवल्यानंतर अवघ्या तासाभरात सापडली. नागेश सावंत विरार लोकलमधून प्रवास करत असताना ही घटना घडली. सुरुवातीला नागेश सावंत यांना त्यांच्या बॅगेची चोरी झाली आहे असे वाटले.

नालासोपारा येथे उतरणाऱ्या एका प्रवाशाने चुकून आपली बॅग समजून नागेश सावंत यांची रोकड असलेली बॅग उचलली होती. रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास नागेश यांनी दादरहून विरारला जाण्यासाठी ट्रेन पकडली. नागेश सावंत विरारला राहणाऱ्या आपल्या भावाकडे चालले होते. त्यांच्याकडे १ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग होती. विरार लोकल पकडल्यानंतर त्यांनी डब्यातील रॅकवर पैशांनी भरलेली बॅग ठेवली.

विरार स्टेशनवर उतरताना ते रॅकवरुन बॅग काढायला गेले. त्यावेळी बॅग तिथे नव्हती. त्यांनी लगेच वसई रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी नायगाव, वसई आणि नालासोपारामधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पण त्यातून काही हाती लागले नाही. तासभरात वसई जीआरपी पोलिसांना तुलींग पोलिस स्टेशनमधून फोन आला. राकेश दास (२३) हा तरुण रोकड असलेली बॅग घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आल्याचे तुलींग पोलिसांनी सांगितले.

राकेश वसई जीआरपी कार्यलयात पोहोचला. आपल्या वडिलांनी ट्रेनमधून उतरताना स्वत:ची बॅग समजून रोकड असलेली बॅग उचलून आणल्याचे त्याने अधिकाऱ्यांना सांगितले. घरी पोहोचल्यानंतर चुकून दुसऱ्याची बॅग उचलून आणल्याचे त्यांना समजले. रेल्वे पोलिसांनी ती बॅग नागेश सावंत यांना परत केली व राकेश दासचे कौतुक केले. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 2:18 pm

Web Title: mumbai man loses bag with 1 lakh on train gets it back nagesh sawant virar dmp 82
Next Stories
1 रस्ते गेले वाहून..
2 बारवी धरणातील पाणी जुन्या पातळीवर
3 नाईकांच्या भाजपप्रवेशामुळे शिवसेना अस्वस्थ
Just Now!
X