|| जयेश सामंत

स्थानकांच्या आखणीसाठी सल्लागाराचा शोध सुरू

वडाळा-ठाणे मेट्रो प्रकल्पाच्या कामास सुरुवात केल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आता ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाकडे लक्ष केंद्रित केले आहे. या प्रकल्पातील स्थानके, कारशेड तसेच मार्गाची रचना ठरविण्यासाठी संरचना सल्लागाराची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

मुंबईलगत असलेल्या उपनगरांमध्ये मेट्रो प्रकल्पांचे जाळे विणण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत बेलापूर-तळोजा-पेंधार या मार्गावर मेट्रो मार्गाची उभारणी सुरू असताना ठाणे आणि आसपासच्या उपनगरांमध्येही या प्रकल्पांची आखणी करण्यात मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने सुरुवात केली आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो प्रकल्पाच्या कामास नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे.

ठाणे मेट्रो प्रकल्पाचा गायमुखपर्यंत विस्तार करत असताना सरकारने ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या आखणीकडे लक्ष केंद्रित केले आहे. या प्रकल्पाचा मूळ आराखडा तसेच अंदाजित रकमेस मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या संचालक मंडळात यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. हे करत असताना या मार्गावरील मेट्रो स्थानकांचे डिझाइन तसेच कारशेडची रचना कशी असावी हे ठरविण्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंबंधीची निविदा मागविण्यात आली असून येत्या दोन महिन्यांत सल्लागार नियुक्त केला जाईल, अशी माहिती एमएमआरडीएमधील सूत्रांनी दिली.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाची मार्गिका कोठून जाईल याविषयीचे आराखडे यापूर्वीच निश्चित करण्यात आले असून जमीन संपादन तसेच निधी उभारणीसाठी वाढीव चटईक्षेत्राच्या आखणीच्या प्रस्तावांना एमएमआरडीएच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार वाढीव चटईक्षेत्राची आखणी करत मार्गालगत निवासी तसेच व्यावसायिक संकुलांची उभारणी आणि विक्रीतून निधी उभा करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी खासगीकरणाचा मार्ग स्वीकारला जाणार आहे. यासंबंधी धोरणात्मक निर्णय राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असतानाच स्थानकांच्या उभारणीतील महत्त्वाचा टप्पा सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.