गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरातील पाणीकपात रद्द; भिवंडीकरांना मात्र निर्णयाची प्रतीक्षा

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्य़ाच्या धरणांमधील पाणी साठय़ात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने ठाणे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठय़ात लागू केलेली २० टक्के कपात अखेर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची आज, गुरुवारपासून अंमलबजावणी केली जाणार असल्याने गणेशोत्सवाच्या तोंडावर ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेने भिवंडी शहरात लागू केलेली कपात रद्द करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

ठाणे महापालिका क्षेत्रात विविध स्त्रोतांमार्फत दररोज ४८० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी ६५ दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा मुंबई महापालिकेकडून करण्यात येतो. जून आणि जुलै महिन्यामध्ये फारसा पाऊस झाला नसल्यामुळे  धरण आणि तलावातील पाणी साठय़ाचे नियोजन करण्यासाठी मुंबई महापालिकेने २० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ५ ऑगस्टपासून ठाणे आणि भिवंडी महापालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठय़ात २० टक्के कपात लागू करण्यात आली. मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला दररोज ६५ ऐवजी ५२ एमएलडी इतकाच पाणीपुरवठा होत होता. दररोज १३ दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा कमी होत होता. या कपातीमुळे शहरातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून यामुळे मुंबई महापालिकेच्या धरण आणि तलाव क्षेत्रातील पाणी साठय़ात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केलेल्या सुचनेनुसार पाणीपुरवठा विभागाने मुंबई महापालिकेकडे पाणीकपात रद्द करण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्यास अखेर यश आले आहे. यासंदर्भात ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्याशी संपर्क साधला असता,  ठाण्यातील पाणीकपात रद्द करण्याची मागणी मुंबई महापालिकेकडे केली होती. ही मागणी मुंबई महापालिकेने मान्य केली असून त्यानुसार आज, गुरुवारपासून ही कपात रद्द होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

भिवंडीत पाणीकपात सुरूच 

मुंबईकडून भिवंडी महापालिका क्षेत्रात दररोज ४० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येत असून त्यामध्ये मुंबई महापालिकेने २० टक्के पाणीकपात लागू केली आहे. ही कपात मागे घेण्यासाठी मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा सुरू असून याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे भिवंडीतील शांतीनगर, भिवंडी शहर, क्वाटरगेट मशीद, हंडी कंपाऊंड, इदगा रोड, रोशन बाग, पद्मानगर आणि भादवडचा काही भाग या परिसरात पाणी कपात कायम आहे, अशी माहिती महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण गायकवाड यांनी दिली.