नावे विभागप्रमुखांकडे देण्याची महापौरांची सूचना

वसई : वसई-विरारमधून मुंबईला अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला ये—जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सोय मुंबईतच करण्याची तयारी मुंबई महापालिकेने दर्शवली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना मुंबईत राहण्याची इच्छा असेल त्यांनी नावे विभागप्रमुखांकडे दिल्यास त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था मुंबईतील हॉटेलांमध्ये करता येईल, असे मुंबईच्या महापौरांनी स्पष्ट केले.

वसई-विरार शहरातून हजारो नागरिक दररोज मुंबईत कामाला ये—जा करतात. टाळेबंदीमुळे इतरांचा प्रवास थांबला असला तरी अत्यावश्यक सेवा म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी दररोज ये-जा करत आहेत. त्यात मुंबई महापालिका रुग्णाय, खासगी रुग्णालय, तसेच पालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. काही दिवसांपासून वसई-विरार शहरातील याच नागरिकांना करोनाची लागण होत आहे. जे कर्मचारी मुंबईत ये-जा करतात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना लागण होत असल्याचे आढळून आले आहे. रविवार ३ मे च्या आकडेवारीनुसार शहरातील दीडशे रुग्णांपैकी सुमारे ७५ हून अधिक रुग्ण हे मुंबईत ये-जा करणारे कर्मचारी आणि त्यांच्या संपर्कातील आहेत.

यामुळे या कर्मचाऱ्यांची  राहण्याची सोय मुंबईतच करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नालासोपाराचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी यासंदर्भात मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही याबाबत पालिकेला कळविले होते. याबाबत मुंबई महापालिकेने सकारात्मकता दाखवली आहे. आमच्याकडे अत्यावश्यक सेवेसाठी काम करणारे कर्मचारी आहेत, त्यातील काही लोकांची सोय करण्यात आली आहे. परंतु, ज्यांना मुंबईतच रहायचं आहे, त्यांनी नावे विभागप्रमुखांकडे द्यावीत, असे मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. मुंबई बाहेरून किती कर्मचारी शहरात येतात त्याचा निश्चित आकडा नाही. मात्र, मुंबईतील विविध हॉटेले ताब्यात घेऊन या सर्व कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

आम्ही शहरात करोनाची लागण होऊ नये यासाठी प्रय करत आहोत. परंतु मुंबईत ये—जा करणारे जे आहेत, त्यांनाच लागण होत असल्याचे दिसून येत असल्याचे पालिकेच्या अधिकार्म्यांनी सांगितले आहे. मुंबईत काम करणाऱ्यांची मुंबईत व्यवस्था करावी, असा प्रस्ताव यापूर्वी आम्ही मुंबई  पालिकेला दिल्याची माहिती वसई-विरार पालिकेचे अतिरिक्त आयमुक्त संजय हेरवाडे यांनी दिली.