शाहीस्नानाचे दिवस..
२८ ते ३० ऑगस्ट, १२ ते १४ सप्टेंबर, १७ ते १९ सप्टेंबर, २५ सप्टेंबर रोजी शाहीस्नान होणार असून या दिवशी भिवंडीतील गोदामे बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान २५ सप्टेंबरला शाहीस्नानाचा दिवस असला तरी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीतही भिवंडीतील गोदामे बंद ठेवण्यात येणार आहेत.
भिवंडी येथील गोदामांमध्ये मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या कोंडीत नाशिक जिल्ह्य़ातील कुंभमेळ्याच्या शाहीस्नानासाठी जाणारे भाविक अडकू नयेत यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी या दिवशी तब्बल ४५ हजार गोदामे बंद ठेवण्याचे फर्मान काढले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी कुंभमेळानिमित्ताने अवजड वाहतूक वळविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे वाहतूक पोलिसांनी अशा स्वरूपाचा निर्णय घेतला असून यासंबंधी त्यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यास जिल्हा प्रशासनाने एका बैठकीत तत्त्वत: मान्यता दिल्याने शाहीस्नानच्या दिवशी भिवंडीतील गोदामे बंद राहणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
ठाणे शहराला खेटूनच असलेल्या भिवंडी भागात मोठी गोदामे उभी राहिली असून या गोदामांचा आकडा सुमारे ४५ हजारांच्या घरात आहेत. काल्हेर, कशेळी, पूर्णा, राहनाळ, कोपर, अंजूर, वळगाव, दापोडा, मानकोली, कोनगाव, राजनोली, गोळेगाव आदी भागांत ही गोदामे आहेत. यापैकी अनेक गोदामांची कार्यालये मुंबई भागात असून या कंपन्यांचा परदेशातून येणारा माल जेएनपीटी बंदरात येतो. भिवंडीतील गोदामात त्याचा साठा करण्यात येतो. त्यात इलेक्ट्रॉनिक साहित्य, केमिकलयुक्त पदार्थ तसेच अन्य सर्वच प्रकारचे साहित्य आदींचा समावेश असतो. त्यामुळे जेएनपीटी बंदर ते भिवंडी अशी अवजड वाहनातून या मालाची वाहतूक शाहीस्नानासाठी भिवंडीत गोदामबंदी
सातत्याने सुरू असते. याशिवाय, या गोदामांमध्ये अन्य कंपन्यांचाही माल ठेवण्यात येतो. तसेच सर्वच गोदामांमधील माल मोठय़ा किंवा छोटय़ा वाहनातून वेगवेगळ्या भागांत नेण्यात येतो. गोदामात येणाऱ्या अवजड तसेच अन्य वाहनांची वाहतूक शीळफाटा मुंब्रा, कळवा, खारेगाव, कापुरबावडी यामार्गे सुरू असते. त्यामुळे या भागासह ठाणे तसेच भिवंडी शहराला भेदणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. नाशिक जिल्ह्य़ातील कुंभमेळाच्या निमित्ताने शाहीस्नानासाठी जाणारे भाविक या वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी शाहीस्नानाच्या दिवशी भिवंडीतील सुमारे ४५ हजार गोदामे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी कुंभमेळानिमित्ताने अवजड वाहतूक वळविण्याचे आदेश दिले होते. त्याआधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. या वृत्तास ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिला आहे.