News Flash

वाहतूक विघ्न कायम!

मुंबई-नाशिक महामार्गावर संबंधित प्राधिकरणाकडून रात्रीच्या वेळेत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येतात.

वाहतूक विघ्न कायम!

मुंबई-नाशिक महामार्ग, घोडबंदर रस्ता, मुंब्रा बावळण मार्गावर कोंडी

ठाणे : खड्डे, अवजड वाहनांची वर्दळ, वाहतूक नियोजनातील ढिसाळपणा आणि शासकीय यंत्रणांच्या नाकर्तेपणामुळे ठाणे आणि परिसरातून रस्तेमार्गे प्रवास करणाऱ्यांना मंगळवारी, सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडीच्या विघ्नाला सामोरे जावे लागले. पावसाने मंगळवारी उसंत घेतल्यानंतर विविध मार्गावर सुरू झालेल्या खड्डेभरणीच्या कामांमुळेही वाहतुकीवर परिणाम झाला. घोडबंदर, ठाणे शहर आणि मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून अवजड वाहने एकाच वेळी मुंबई-नाशिक महामार्गावर येत असून तुलनेने हा रस्ता अपुरा पडत असल्याने ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येऊ लागले आहेत.

ठाणे जिल्ह्यात सोमवारी पावसाने धरलेला जोर, रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यातच दोन ठिकाणी बंद पडलेली अवजड वाहने यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले होते. त्याचा परिणाम शीळफाटा, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, भिवंडी भागातील वाहतुकीवर झाला होता. यामुळे आठवडय़ाचा पहिलाच दिवस नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. असे असतानाच मुंबई-नाशिक महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच वाहतूक कोंडी झाली होती. साकेत पुलापासून ते माजिवाडा आणि कापुरबावडी उड्डाण पुलापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. या कोंडीत अडकलेले नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले होते.

मुंबई-नाशिक महामार्गावर संबंधित प्राधिकरणाकडून रात्रीच्या वेळेत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येतात. परंतु पाऊस आणि सततच्या अवजड वाहतुकीमुळे हे खड्डे पुन्हा उखडतात. तसेच खड्डय़ांमध्ये भरलेले काँक्रीट रस्त्यावर इतरत्र पसरून त्याचे उंचवटे तयार होतात. यामुळे रस्ते उंचसखल होतात. त्याचा अवजड वाहतुकीला फारसा अडथळा निर्माण होत नाही. पण, कार आणि दुचाकींना उंच-सखल रस्त्यांमुळे वेग मंदावतो आणि महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

घोडबंदर, ठाणे शहर आणि मुंब्रा बाह्यवळण या तिन्ही मार्गावरून मुंबई-नाशिक महामार्गावर एकाच वेळी अवजड वाहने येत आहेत. यापूर्वी काही वाहने बाळकुम-कशेळी-काल्हेर मार्गे भिवंडीतून जात होती. परंतु या भागातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अवजड वाहने मुंबई-नाशिक महामार्गेच वाहतूक करीत आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहनांचा भार वाढला आहे.

शहरातील वाहतूक सुरळीत

कोंडीचा फटका ठाणे शहरातील वाहतुकीला बसू नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी नवे नियोजन आखले आहे. यानुसार घोडबंदर, खारेगाव, मुंब्रा आणि शीळफाटा या भागांत काही वेळेकरिता अवजड वाहतूक रोखून धरली जात आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहनांच्या रांगा माजीवाडा पुलापर्यंतच येत असल्याने शहरातील इतर वाहतुकीला त्याचा अडथळा निर्माण होत नाही. वाहतूक पोलिसांनी आखलेल्या नव्या नियोजनामुळे ठाणे शहरातील वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसून आले.

मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलाजवळ अरुंद रस्ता असल्याने या ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावून वाहनांच्या रांगा लागत आहेत. परंतु ही वाहतूक संथगतीने सुरू असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी नाही.

– श्रीकृष्ण कोकाटे, प्रभारी उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2021 1:40 am

Web Title: mumbai nashik highway ghodbander road pits road thane ssh 93
Next Stories
1 गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा नेण्याची वेळ!
2 ‘ई-पीक’ अ‍ॅपनोंदणीसाठी गणेशोत्सवाद्वारे प्रबोधन
3 अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्यालयाचे प्रवेशद्वार, स्कायवॉक धोकादायक
Just Now!
X