साकेत खाडीपुलाच्या कामामुळे वाहनचालकांचे हाल बेहाल
ठाणे येथील साकेत भागातील मुंबई-नाशिक महामार्गावरील खाडी पुलाच्या कामामुळे शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी शहरात वाहतूक कोंडी झाल्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी सोमवारी सकाळी अचानकपणे वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला. या बदलांमुळे गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेल्या कळवा-खारेगाव परिसरातील तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातील रहिवाशांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला. दरम्यान, सकाळी वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेले बदल सायंकाळी तसेच रात्रीच्या वेळेत राबविणे शक्य होऊ शकले नाही. त्यामुळे घरी परतणारे ठाणेकर सायंकाळी मात्र कोंडीत सापडल्याचे चित्र दिसून आले.
साकेत खाडी पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे शनिवार तसेच रविवार या दोन्ही दिवशी कळवा, खारेगाव, रेतीबंदर, साकेत परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांची वर्दळ कमी असतानाही शहरामध्ये अभूतपूर्व कोंडी झाली. ठाणे, कळवा तसेच खारेगाव परिसरातील नागरिक मुंबई-नाशिक महामार्गाद्वारे वाहनाने मुंबईत जातात. साकेत पुलाच्या कामामुळे खारेगाव तसेच कळवा परिसरातील रहिवाशांना महामार्गाद्वारे शहरात वाहने नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही वाहने कळवा नाकामार्गे शहरात वळविण्यात आली. त्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे.
या पाश्र्वभूमीवर ठाण्याचे सह पोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी रविवारी स्वत: रस्त्यावर उतरून शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. सुमारे पाच तासांच्या या दौऱ्यादरम्यान सह आयुक्त डुम्बरे यांनी केलेल्या सूचनांच्या आधारे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी सोमवारी सकाळी साकेत पुलाजवळील वाहतूक व्यवस्थेत काहीसा बदल केला.
साकेत खाडी पुलावरील मुंबई-नाशिक वाहिनीवर दोन मार्गिका असून या मार्गिका वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात आल्या आहेत. सकाळच्या वेळेत मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वर्दळ कमी असते. त्यामुळे दोनपैकी एका मार्गिकेवरून नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने सोडण्यात आली. कळवा तसेच खारेगाव परिसरातील अनेक वाहने या मार्गाने मुंबईच्या दिशेने गेली.
त्यामुळे कळवा-खारेगाव भागातील वाहतूक व्यवस्था काहीशी सुरळीत होती. त्याचप्रमाणे मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी पुलाजवळ वाहनांचा भार वाढून कोंडी होऊ नये म्हणून मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणारी एक मार्गिका मुंबईत जाणाऱ्या वाहनांसाठी खुली करण्यात आली होती.
या बदलाच्या प्रयोगामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
सोमवारी सकाळी साकेत खाडी पुलावर करण्यात आलेल्या बदलांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहिली असली तरी वाहतूक पोलिसांना हा बदल सायंकाळी राबविणे शक्य झाले नाही. रात्री आठनंतर शहरामध्ये अवजड वाहनांची वाहतूक सुरू होते.
तसेच रात्रीच्या वेळेस मार्गिकेच्या मधोमध उभे असलेल्या पोलिसांना अंधारामुळे वाहनांची धडक बसून अपघात होऊ शकतो. त्यामुळे सायंकाळी तसेच रात्री बदल राबविणे शक्य झाले नाही. त्यामुळे सायंकाळी तसेच रात्री शहरात पुन्हा वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.