वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे महामार्गावर कोंडी; ठाण्यातील अंतर्गत वाहतुकीवरही परिणाम

मुंबई आणि नवी मुंबई शहरात कामानिमित्त दररोज वाहतूक करणाऱ्या नोकरदार वर्गाच्या वाहतुकीसाठी मुंबई-नाशिक महामार्ग महत्त्वाचा मानला जातो. हा महामार्ग आनंदनगरपासून कापूरबावडीपर्यंत ठाणे शहर, वागळे इस्टेट आणि पोखरण परिसरातील अंतर्गत रस्त्यांना जोडण्यात आलेला आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून हा मार्ग महत्त्वाचा आहे. मात्र, हा मार्ग सदैव वाहतूक कोंडीत अडकत असल्याने याचा परिणाम अवघ्या ठाणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर जाणवतो.

वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या मार्गावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी चार पदरी मार्गिका आहेत. मात्र, कोपरी पुलावर प्रत्येकी दोन मार्गिका आहेत. परिणामी महामार्गाच्या चार पदरी मार्गिकेवरून येणाऱ्या वाहनांचा पुलाजवळ खोळंबा होऊन सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामाच्या कालावधीत पुलाच्या परिसरातील कोंडीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. याच मार्गावर पुढे असलेल्या टोलनाक्यांवर टोलच्या वसुलीसाठी वाहने अडविली जातात. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागून कोंडी होते.

मुंब्रा बाह्य़वळण मार्ग बंद असल्यामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत मुंबई-नाशिक महामार्गावरून अवजड वाहतूक सोडण्यात येते. या वाहतुकीमुळे एरवी सकाळ आणि सायंकाळ या गर्दीच्या वेळेत कोंडी होणाऱ्या मार्गावर आता दुपारच्या वेळेतही कोंडी दिसून येते. हा मार्ग पुढे भिवंडी आणि कल्याण शहरातील रस्त्यांना जोडण्यात आला असून या जोड रस्त्यावरील मानकोली आणि रांजनोली जंक्शवरही प्रचंड कोंडी होते.

जास्त वर्दळ का?

  • मुंबई-नाशिक महामार्ग ठाणे, खारेगाव, भिवंडी, कल्याण आणि नाशिक शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो.
  • मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील वाहने पारसिक रेतीबंदर मार्गे महामार्गावर येऊन पुढे जातात.
  • भिवंडीतील गोदामांमधील विविध वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे.
  • ठाणे, वागळे आणि घोडबंदर भागातील नोकरदार वर्गाची वाहने दररोज मुंबई आणि नवी मुंबईत याच मार्गावरून प्रवास करतात.

कोपरी पुलाच्या कामाचे आव्हान

महामार्गावरील अरुंद कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या कामामध्ये सुरुवातीला बाजूच्या मार्गिका तयार करण्यात येणार असून या काळात सद्य:स्थितीत असलेल्या मार्गिकांवरून वाहतूक सुरू राहणार आहे. त्यानंतर बाजूच्या मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करून जुन्या मार्गिकांचे काम हाती घेण्यात येणार आहे. मात्र, या कामादरम्यान कोंडी होण्याची शक्यता आहे.

कोंडीची मुख्य ठिकाणे

आनंदनगर, कोपरी, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवाडा, साकेत खाडी पूल, खारेगाव, रांजनोली आणि मानकोली

महमार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची प्रभावीपणे कारवाई केल्यास कोपरी पुलाच्या कामादरम्यान होणाऱ्या कोंडीतून काहीसा दिलासा मिळू शकेल. उड्डाण पुलांवर खड्डे पडल्यामुळे अनेक वाहने पुलाखालून जात आहेत. त्यामुळेही पुलाखाली वाहनांचा भार वाढून कोंडी होत आहे. या समस्येच्या उपायासाठी उड्डाण पुलावरील खड्डे बुजविणे गरजेचे आहे.

– संजय केळकर, आमदार, ठाणे शहर