पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची स्पष्टोक्ती

ठाणे : मुंबई शहरात सुरू केलेल्या रात्रजीवन (नाइट लाइफ) कसा प्रतिसाद मिळतो, याबाबत आढावा घेतल्यानंतरच ही संकल्पना ठाण्यात राबविण्याचा विचार करू, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच आमदारांच्या मागण्या विचारात घेता पर्यटन खात्यासाठी वेगळा अर्थसंकल्प असावा, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

ठाण्याच्या ‘संस्कृती आर्ट फेस्टिवल’ला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, पर्यटन विभागात आधी उत्साह नव्हता. मात्र, माझ्याकडे खाते आल्यानंतर या विभागात उत्साह आल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने ग्रामीण आणि शहरी भागात जी कामे हाती घेतली आहेत, ती उत्तम आणि दर्जेदार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

घोडबंदर किल्ल्याचा विकास करून त्या ठिकाणी शिवसृष्टीच्या धर्तीवर प्रकल्प राबविण्यात यावा, तसेच उपवन तलाव आणि उपवन घाट यांचा विकास करून त्याचा पर्यटन स्थळांत याचा समावेश व्हावा, अशी मागणी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आदित्य यांनी स्पष्ट केले.