रात्रीची मुंबई सगळ्यांच्या फायद्याची असून पाच रुपयांची वस्तू विकणाऱ्यापासून लाखोंचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकालाच याचा फायदा होईल, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी सध्याच्या गाजत असलेल्या मुद्दय़ावर केले. रात्रीची मुंबई सुरू राहावी, या त्यांनीच चर्चेत आणलेल्या मुद्दय़ाभोवती वादाचे आणि राजकारणाचे ढग जमू लागले असताना त्यांनी पुन्हा त्यांच्या मुद्दय़ाचे समर्थन केले.
गुरुवारी बदलापूर येथे विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमासाठी ते आले होते. रात्री मुंबईतील हॉटेल, पब्स, केमिस्ट, व्यावसायिकांची दुकाने सुरू राहण्याबरोबरीनेच सामान्य विक्रेत्यांनासुद्धा यात स्थान देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. यात दूध विक्री केंद्रे, वडापाव विक्रेत्यांचा पर्यायाने मराठी माणसाचाही आम्ही विचार केला आहे.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांच्या उचलबांगडीच्या निर्णयाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत राज्यपाल आणि मुंबई उच्च न्यायालयाचे आभार मानले. याबाबत बोलताना ते म्हणाले की, युवा सेनेची ही जुनी मागणी असून आता मुंबई विद्यापीठात यापूर्वी झालेले पेपर फुटीसारखे गैरप्रकार थांबतील.
‘युती उद्धव ठाकरे ठरवतील’
अंबरनाथ व बदलापूर नगरपालिका निवडणुका दोन महिन्यांवर आल्याच्या पाश्र्वभूमीवरच आदित्य ठाकरे यांनी बदलापूरच्या विकासकामांची पाहणी केली. या वेळी त्यांनी अंबरनाथ व बदलापूरमध्ये शिवसेना आणि भाजपची युती होणार का, या प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळून याबाबत वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील, असे सांगितले.