ऐन दिवाळीच्या तोंडावर रविवारी रेल्वेने घेतलेल्या मेगा ब्लॉकचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. या मेगा ब्लॉकव्यतिरिक्त रविवारी ठाणे स्थानकापुढील कल्याण दिशेकडील मार्गिकेवर तांत्रिक बिघाड झाल्याने गाडय़ा अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या.

दिवाळीच्या खरेदीसाठी रविवारी मोठय़ा प्रमाणात नागरिकांची ठिकठिकाणी गर्दी पाहायला मिळाली. खास दिवाळीच्या खरेदीसाठी ठाणे, दादर, सीएसटीएमसारख्या महत्त्वांच्या बाजारपेठांमध्ये जाण्यासाठी रविवारी रेल्वे स्थानकांवर गर्दी होती. मात्र उपनगरी रेल्वेमार्गावरील तिन्ही मार्गावर महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामे करण्याकरिता मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. यावेळी मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० पर्यंत मेगा ब्लॉक असल्याची सूचना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्या कामाचा भाग म्हणून सकाळी ९.२५ ते दुपारी २.५४ पर्यंत सीएसएमटीहून जाणाऱ्या  लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या स्थानकांतही थांबिण्यात आल्या. ठाण्याच्या पुढे जलद लोकल पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने धिम्या मार्गावर प्रवाशांच्या गर्दीचा ताण आला होता. ठाणे ते कल्याणपर्यंत सर्व जलद गाडय़ा धिम्या मार्गावरून चालवल्या गेल्या. परिणामी, या लोकल सुमारे २० मिनिटे उशिराने धावतील अशी पूर्वसूचना रेल्वेकडून देण्यात येत होती. अशातच ठाणे रेल्वे स्थानकापुढील मार्गिकेवर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे या लोकल  उशिराने धावत असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

उत्सवांच्या काळात खरेदीसाठी किंवा नातेवाईकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी रेल्वेचा प्रवास सोयीस्कर ठरतो. सणांच्या काळातील सुट्टींच्या दिवशी घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे उत्साहावर विरजण पडते. गाडय़ांना होणारा उशीर आणि गर्दीमुळे प्रवासाचा मनस्ताप होतो.   -प्रांजली उत्तेकर, प्रवासी