चार तास जलद मार्ग बंद; प्रवाशांचे हाल
कल्याणकडून ठाण्याच्या दिशेने जाणारा जलद मार्ग रविवारी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे चार तास बंद ठेवण्यात आला होता. सकाळी १०.३० वाजल्यापासून दुपारी ३.३० पर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे कल्याणवरून ११.२२ वाजता शेवटची जलद लोकल मुंबईकडे रवाना झाली. त्यानंतर सुमारे चार तास जलद मार्ग बंद झाल्यामुळे प्रवाशांना धिम्या मार्गावरून प्रवास करण्याची वेळ आली. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी अर्धा ते एक तासाचा उशीर प्रवाशांना होत होता. त्यामुळे उन्हाचे चटके आणि उष्णतेच्या झळासहन करत प्रवास करावा लागत होता.
मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर कल्याण-ठाणे दरम्यान जलद मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. देखभाल दुरुस्तीच्या नेहमीच्या कामासाठी जलदमार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यामुळे कल्याणवरून धिम्या मार्गावरून गाडय़ा मुंबईच्या दिशेने रवाना होत होत्या. कल्याण-ठाकुर्ली-डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा-कळवा या स्थानकादरम्यान या सगळ्या गाडय़ा धावत होत्या. तर ठाण्यापुढे मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा असा प्रवास सुरू होता. सुमारे २० मिनिटांचा फटका यामुळे प्रवाशांना होईल, असे रेल्वेचा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र अर्धा ते एक तासांचा उशीर या गाडय़ांसाठी होत होता. मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ांच्या उशिरा धावत असल्याचा फटका मुंबईकडून कल्याणकडे जाणाऱ्या गाडय़ांनाही सहन करावा लागत होता. उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत
होता.

रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिव्यावरून..
रत्नागिरी -दादर पॅसेंजर गाडीला या मेगाब्लॉकचा फटका सहन करावा लागला. दादरला येणारी ही गाडी दिवा स्थानकात थांबवण्यात आली तेथूनच ती रत्नागिरीकडे पुन्हा रवाना केली. त्यामुळे कोकणातून येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. दिवा स्थानकात उतरून लोकल गाडय़ांनी त्यांना दादर गाठावे लागले. तर दादरवरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनाही सामानासह दिवा गाठावे लागले. यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली होती. रत्नागिरी दादर पॅसेंजरच्या दिवा स्थानकातून सुटण्याच्या प्रकारामुळे ही गाडी दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडी बनली आहे, असा सूर प्रवाशांकडून लगावला जात आहे.