वर्सोवा पूल १८ महिन्यांत पूर्ण; नितीन गडकरी यांची घोषणा

मुंबई ते दिल्ली महामार्गावरील एक मार्गिका विजेवर चालणारी करण्यात येणार असून या मार्गिकेवरील इलेक्ट्रिक केबलच्या साहाय्याने अवजड वाहतूक थेट मुंबईत करणे आता शक्य होणार आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मीरा रोड येथे दिली. वसई खाडीवरील वर्सोवा पुलासह विविध विकास कामांचे भूमिपूजन गुरुवारी मीरा रोड येथे करण्यात आले. हा पूल येत्या १८ महिन्यांत पूर्ण करण्याची ग्वाही गडकरी यांनी यावेळी दिली.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथे बांधण्यात येणाऱ्या नव्या खाडी पुलासह ३ हजार कोटी रुपयांच्या सात विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सहकारमंत्री चंद्रकात पाटील, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

रस्त्यावरील वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्यासाठी विजेवर आधारित वाहतूक व्यवस्था अमलात आणण्याची गरज असून महापालिकांनी त्यानुसार नियोजन करावे. यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषण यावर मात करता येणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारने लंडन ट्रान्स्पोर्ट या कंपनीशी नुकताच सामंजस्य करार केला असून याद्वारे प्रवाशांना इलेक्ट्रिकवरच्या दुमजली वातानुकूलित बसमधून अध्र्या किमतीत प्रवास करता येणार आहे असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. वरळी ते वांद्रे सागरी मार्ग वर्सोवापर्यंत आणि त्यानंतर थेट वसई विरापर्यंत नेण्यात येणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.

कंत्राटदारांसोबत झालेला वाद, पर्यावरण विभागाची मंजुरी यामुळे वर्सोवा खाडी पुलाच्या कामाला दोन ते अडीच वर्षे उशीर झाला आहे. मात्र, राज्य सरकारने येथील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात सहकार्य केले तर पुलाच्या कामाची मुदत २४ महिने असतानाही तो १८ महिन्यात पूर्ण करण्यात येईल. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुंबई-वडोदरा या ३७८ किलोमीटर लांबीच्या २० हजार कोटी रुपयांच्या द्रुतगती महामार्गाचे काम येत्या ३ महिन्यांच्या आत सुरू करण्यात येत असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. ठाणे जिल्हा आणि आसपासच्या अनेक रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात येत असल्याची घोषणा यावेळी गडकरी यांनी केली.

मुंबईतील विविध जलमार्गाचे प्रकल्प अहवाल तयार असून वसई, गोराई आणि बोरीवली या जलमार्गाच्या कामाची सुरुवात पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर सुरू करण्यात येईल. मुंबई ते न्हावा शेवा हा २२ किलोमीटरच्या देशातील सर्वात मोठय़ा सागरी सेतूच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असून येत्या ४ वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करून रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.