अतिसंक्रमित क्षेत्रात सातत्याने घट

ठाणे : ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या महापालिका क्षेत्रांत करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्य़ांवर पोहोचले असतानाच गेल्या आठ दिवसांत दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येतही निम्म्याने घट झाली आहे. सुरुवातीपासूनच रुग्णसंख्येत आघाडीवर असलेल्या मुंब्रा आणि वागळे इस्टेट या दोन्ही भागांमध्ये रुग्णसंख्येत सलग चौथ्या दिवशी कमालीची घट दिसून आली.

ठाणे महापालिका क्षेत्रातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या वागळे इस्टेट आणि मुंब्रा हे भाग रुग्णसंख्येत आघाडीवर होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही भागांत रुग्णांचा आकडा आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. महिनाभरापूर्वी शहरात दररोज चारशे ते पाचशे रुग्ण आढळून येत होते. गेल्या आठ दिवसांपासून ही रुग्णसंख्या दोनशे ते अडीचशेवर आली आहे.

मुंब्य्रात विविध उपाययोजना राबवूनही रुग्णसंख्या नियंत्रणात येत नव्हती. करोनाच्या भीतीपोटी अनेक जण ताप तपासणीदरम्यान खरी लपवीत असल्यामुळे रुग्ण वाढत होते. त्यामुळे मुंब्य्रातील ८३ खासगी डॉक्टरांची मदत घेऊन त्यांच्याकडून संशयित रुग्णांची माहिती मिळविण्यास सुरुवात केली. याशिवाय प्रभागांतील नगरसेवकांची समिती, महिला बचत गट यांच्या प्रयत्नांतून मुंब्य्रात रुग्णसंख्येत घट झाली, अशी माहिती मुंब्य्राचे प्रभारी उपायुक्त महेश आहेर यांनी दिली.

शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या वागळे इस्टेट भागात मोठय़ा प्रमाणात चाळी आणि इमारती आहेत.  अशा इमारतींचा शोध घेऊन तेथील शौचालयांची साफसफाई करणे, प्रतिबंधित क्षेत्रात टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी यामुळेच वागळे इस्टेट परिसरात आता करोना रुग्णसंख्या कमी झाली आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.

 

गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांची संख्या वाढविणे,  लक्षणे नसलेल्यांना अलगीकरणात पाठविणे यासारखी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे. अतिसंक्रमित क्षेत्रात या मोहिमेचे सकारात्मक परिणाम दिसत असून यापुढेही अधिक लक्ष देऊन ही मोहीम सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

– डॉ. विपीन शर्मा, महापालिका आयुक्त, ठाणे