20 November 2019

News Flash

रमजानमध्येही मुंब्रा फेरीवाला मुक्त

कारवाईमुळे रमजानच्या काळातही मुंब्य्रातील मुख्य रस्ता फेरिवालामुक्त असल्याचे चित्र दिसून येते.

मुंब्य्रातील रस्ते फेरीवाला मुक्त झाल्याने पादचारी आणि वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला.

पालिकेची कारवाई आणि फेरीवाला नियोजनाचे यश

ठाणे : मुंब्रा शहर आणि स्थानक परिसरातील वाहतुकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणारा रस्ता अडविणाऱ्या फेरिवाल्यांविरोधात महापालिकेकडून गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने कारवाई सुरु असून या कारवाईमुळे रमजानच्या काळातही मुंब्य्रातील मुख्य रस्ता फेरिवालामुक्त असल्याचे चित्र दिसून येते. रमजानच्या काळात फेरिवाल्यांसाठी अंतर्गत रस्त्यांवर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून यामुळे मुख्य रस्ता वाहतूक कोंडीमुक्त झाला आहे. या रस्त्यावरून मुंब्रा ते कौसापर्यंतचे अंतर पार करण्यासाठी अर्धा तासांपेक्षा अधिक अवधी लागत होता. हेच अंतर पार जेमतेम दहा मिनीटे लागत आहेत.

ठाणे स्थानक परिसर तसेच शहराच्या विविध भागातील रस्ते आणि पदपथ अडविणाऱ्या फेरिवाल्यांविरोधात महापालिकेकडून सातत्याने कारवाई करण्यात येते. कारवाईनंतर पथक पुढे जाताच फेरिवाले पुन्हा त्या ठिकाणी ठाण मांडून बसतात. पंधरा दिवसांपुर्वी नौपाडय़ात आंबा विक्री स्टॉलवरून मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर महापालिकेने फेरिवाल्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली असून या कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून शहर फेरिवालामुक्त दिसू लागले आहे. मुंब्य्रात मात्र गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने कारवाई सुरु असून त्यामुळे रमजानच्या काळातही शहरातील मुख्य रस्ता फेरिवालामुक्त दिसत आहे. मुंब्रा शहरातील मुख्य रस्ता वाहतूकीसाठी महत्वाचा मानला जातो. हाच मार्ग मुंब्रा स्थानकाला जोडण्यात आलेला आहे. या मार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन महापालिकेने या रस्त्याचे रुंदीकरण केले. यामुळे दोन पदरी रस्ता आता चार पदरी झाला आहे. असे असले तरी रुंदीकरणानंतर या मार्गावर फेरिवाले बसत असल्यामुळे कोंडीची समस्या सुटू शकली नव्हती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून या मार्गावरील फेरिवाल्यांविरोधात पालिकेकडून कारवाई सुरु आहे. रमजानच्या काळात या भागात कपडे तसेच अन्य साहित्य विक्रीचे स्टॉल मोठय़ा प्रमाणात लागतात. यंदा मात्र मुख्य रस्त्यावरील स्टॉल अंतर्गत मार्गांवर लागलेले दिसून येतात. गुलाब आणि कौसा भागातील मार्केटही अंतर्गत रस्त्यांवर हलविण्यात आले आहे.

अडीच हजार फेरीवाल्यांवर कारवाई

गेल्या सहा महिन्यात मुंब्य्रातील मुख्य रस्ते अडविणाऱ्या अडीच हजारहून अधिक फेरिवाल्यांवर कारवाई केली आहे. तसेच वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना जीव गमावावा लागल्याच्या घटना घडल्या असून या पाश्र्वभूमीवर फेरिवाल्यांशी चर्चा करून त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलविले आहे. मित्तल कंपाऊड आणि तनवरनगर भागात रमजानसाठी मार्केट उभारून दिले आहे. या कारवाईदरम्यान आमच्यावर हल्ले झाले आणि धमक्यांचे फोन आले. पण, आम्ही कारवाई सुरुच ठेवली. सर्वच राजकीय पक्ष आणि पोलिसांच्या सहकार्यामुळे मुख्य रस्त्यावरील फेरिवाले हटविणे शक्य झाले आहे, अशी माहिती मुंब्रा प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी दिली.

First Published on May 22, 2019 3:44 am

Web Title: mumbra become hawkers free in ramadan
Just Now!
X