21 February 2019

News Flash

मुंब्रा बाह्य़वळण मार्ग खुला; वाहतूक कोंडीतून सुटका

भारत बंद’मुळे रस्त्यावर अवजड वाहने कमी असल्यामुळे वाहतुकीचा अंदाज घेणे शक्य झालेले नाही.

मुंब्रा बाह्य़वळण मार्ग सोमवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

ठाणे : चार महिने दुरुस्तीच्या कामामुळे बंद ठेवण्यात आलेला मुंब्रा बाह्य़वळण मार्ग सोमवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून भिवंडीच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचा ठाणे, नवी मुंबईतील रस्त्यांवर पडलेला भार यामुळे हलका होईल असा दावा केला जात असला तरी सोमवारच्या भारत बंदमुळे नेहमीपेक्षा कमी प्रमाणात अवजड वाहने रस्त्यावर आल्याने नेमके चित्र स्पष्ट होऊ शकले नाही.

मुंब्रा बाह्य़वळण रस्ता खुला झाल्याने मंगळवारपासून ठाणे, नवी मुंबईतील रस्त्यांवरील अवजड वाहतुकीचा ५० टक्के भार कमी होईल, असा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे. दरम्यान, रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी या कामाच्या दर्जाविषयी आतापासूनच शंका उपस्थित केली जात आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरात, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी मुंब्रा बाह्य़वळण मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. दोन महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार होते. मात्र, मुदत उलटूनही काम पूर्ण होऊ शकलेले नव्हते. अखेर चार महिन्यांच्या कालावधीनंतर हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. या दुरुस्ती कामाच्या कालावधीत या मार्गावरील अवजड वाहतूक नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण शहरातून वळविण्यात आली होती. या अवजड वाहतुकीचा भार वाढून ऐरोली, आनंदनगर, कोपरी, तीन हातनाका, नितीन कंपनी, माजिवाडा आणि घोडबंदर भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गावरील वाहतूक आता पुन्हा मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई शहरावरील अवजड वाहतुकीचा भार कमी होऊन कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

सोमवार सकाळपासून मुंब्रा बाह्य़वळण मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या मार्गावरून अवजड वाहतूकही सुरू झाली आहे. या वाहतुकीनंतर शहरातील अवजड वाहनांची कोंडी नेमकी किती कमी झाली, याचा अंदाज वाहतूक पोलिसांना घेणार होते. पंरतु, महागाईच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी भारत बंदची हाक दिली. बंददरम्यान आंदोलनकर्त्यांकडून वाहनांना लक्ष्य केले जाते.

वाहनांची तोडफोड केली जाते. ही तोडफोड टाळण्यासाठी अनेक चालकांनी अवजड वाहने रस्त्यावर आणली नाहीत.

शहरातील रस्त्यांवर नेहमीपेक्षा अवजड वाहनांची संख्या फारच कमी असल्यामुळे पोलिसांना वाहतुकीचा अंदाज घेणे शक्य झाले नाही. तसेच अवजड वाहनांची संख्या रोडावल्यामुळे शहरातील वाहतूकही सुरळीतपणे सुरू होती. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या ठिय्या आंदोलनानंतर महामार्गावरील कोंडी सोडविताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागले, अशी चर्चा होती. मात्र, अवजड वाहने कमी असल्यामुळे ही कोंडी काही वेळातच सोडविण्यात पोलिसांना यश आले.

*भारत बंद’मुळे रस्त्यावर अवजड वाहने कमी असल्यामुळे वाहतुकीचा अंदाज घेणे शक्य झालेले नाही. परंतु मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर वाहतूक सुरू झाल्याने ठाणे, नवी मुंबई शहरातील अवजड वाहतुकीचा भार ५० टक्क्य़ांनी कमी होऊ शकेल.

-अमित काळे,पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा

First Published on September 11, 2018 4:27 am

Web Title: mumbra bypass opens for traffic