मुंब्रा बाह्य़वळण मार्ग दुरुस्तीचा मुहूर्त पुन्हा हुकला

ठाणे : दुरुस्तीच्या कामासाठी मुंब्रा बाह्य़वळण मार्ग मंगळवारपासून बंद ठेवण्याची अधिसूचना ठाणे वाहतूक पोलिसांनी काढली असली तरी ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलिसांकडून त्याच्या हद्दीतील वाहतूक बदलांची अधिसूचना अद्यापही काढण्यात आलेली नाही. या अधिसूचनेशिवाय मुंब्रा बाह्य़वळण मार्ग बंद ठेवून ठाणे ग्रामीण आणि पालघर जिल्ह्य़ातून अवजड वाहतूक वळवणे शक्य होणार नाही. या कारणास्तव मुंब्रा बाह्य़वळण मार्ग दुरुस्तीचा मुहूर्त पुन्हा हुकला असून या अधिसूचनेसाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता आहे. मुंब्रा वळणरस्त्यासारखा महत्त्वाचा मार्ग बंद केला जात असताना जिल्हय़ातील वाहतूक शाखांमध्ये अजूनही याविषयी पुरेसा समन्वय नाही हेच यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून नाशिक, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने होणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी मुंब्रा बाह्य़वळण मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गाच्या दुरुस्तीचे काम गेल्या आठवडय़ात सुरू होणार होते. मात्र सूचना फलकांअभावी हे काम पुढे ढकलण्यात आले. चार दिवसांपूर्वी ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंब्रा बाह्य़वळण मार्ग दुरुस्तीचा मुहूर्त जाहीर केला. त्यानुसार मंगळवार, २४ एप्रिलपासून हा मार्ग बंद ठेवला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. हे काम करत असताना ठाणे शहरातून होणाऱ्या अवजड वाहतूक मार्गात मोठे फेरबदल करण्याचेही उपायुक्त काळे यांनी जाहीर केले. यासंबंधी अधिसूचनाही त्यांनी जाहीर केली.

या अधिसूचनेत ठाण्यासोबत ठाणे ग्रामीण आणि पालघर जिल्ह्य़ातील वाहतूक बदल आणि नियोजनासंबंधी काही निर्णय जाहीर करण्यात आले. ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी जाहीर केलेले वेळापत्रक तसेच वाहतूक नियोजन आराखडय़ानुसार मंगळवारपासून आवश्यक बदल लागू होणार होते. मात्र, या नियोजनाचा महत्त्वाचा भाग असलेल्या ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाने यासंबंधी कोणतीही अधिसूचना अद्याप काढली नसल्याने मंगळवारचा बदल पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, ठाणे आणि पालघर जिल्हा प्रशासनानेही यासंबंधी अधिसूचना काढलेली नाही, तसेच बदलांसाठी महत्त्वाचे ठरणारे सूचना तसेच माहिती मार्गिका फलक उभारण्याचे कामही या मार्गावर अपवादात्मक ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची अजूनही मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याच्या दुरुस्तीनिमित्ताने आवश्यक बदलांची पुरेशी तयारी झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

अंतर्गत वादाचा फटका..

मुंब्रा बाह्य़वळण मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी वाहतूक बदलांची अधिसूचना जाहीर करताना ठाणे वाहतूक पोलिसांनी ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलिसांना विश्वासात घेतले नाही. याच कारणावरून त्यांच्यात अंतर्गत धुसफुस सुरू असून त्याचाच फटका मुंब्रा बाह्य़वळण मार्ग दुरुस्तीच्या कामाला बसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या संदर्भात ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ठाणे वाहतूक पोलिसांनी सगळ्या आवश्यक यंत्रणांना विचारात घेऊनच हे बदल जाहीर केले होते, असे सांगितले. ठाणे ग्रामीण व पालघर पोलिसांच्या अधिसूचनेअभावी हा बदल पुढे ढकलण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

माहिती सादर नाही

ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलिसांच्या हद्दीतील वाहतूक बदलांची अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयातून जाहीर करण्यात येते. मात्र, या बदलांसाठी निश्चित करण्यात आलेले मार्ग आणि वाहतुकीसाठी ठरवून दिलेली वेळ याची माहिती ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलिसांना जिल्हा प्रशासनाकडे द्यावी लागते. मात्र, या दोन्ही पोलीस विभागांनी अद्यापपर्यंत ही माहिती सादर केलेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली, तर वाहतूक बदलांबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडे सोमवारी सादर करण्यात आली असून त्यांच्याकडून बदलांबाबत लवकर अधिसूचना काढण्यात येईल, असा दावा ठाणे ग्रामीणचे प्रभारी पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी केला आहे.

सावळय़ागोंधळाचे प्रदर्शन

मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरून गुजरातच्या दिशेने वाहतूक करणारी अवजड वाहने ऐरोली-आनंदनगैर चेक नाका मार्गे ठाण्यातून तर नाशिकच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने कर्जत-मुरबाड-शहापूर मार्गे वळवण्यात आली आहे. याशिवाय, शिळफाटा-कल्याण मार्गेही अवजड वाहतूक वळवण्यात आली असून या वाहतुकीसाठी वेळ ठरवून देण्यात आली आहे. असे असले तरी गुजरात आणि नाशिकच्या दिशेने जाणारे अनेक मार्ग ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलिसांच्या हद्दीत येतात. त्यामुळे या मार्गासाठी वाहतूक बदलांची अधिसूचना काढणे गैरजेचे असून तशा सूचना ठाणे वाहतूक पोलिसांनी दिल्या होत्या. त्यानंतरही ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलिसांकडून त्याच्या हद्दीतील वाहतूक बदलांची अधिसूचना अद्यापही काढण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंब्रा बाह्य़वळण मार्ग दुरुस्तीचा मुहूर्त पुन्हा दोन ते तीन दिवस लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.