कारवाई केलेल्या रस्त्यावर दुतर्फा फेरीवाले

वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर पेटून उठलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने ठाणे स्थानक परिसरातील फेरीवाले व रिक्षाचालकांना गुरुवारी चोख प्रत्युत्तर दिले असले तरी, अशी कारवाई अल्पप्रभावी कशी ठरते, याचे उत्तम उदाहरण मुंब्य्रातील गुलाब बाजारात पाहायला मिळते. वर्षभरापूर्वी अत्यंत गाजावाजा करत आणि मोठा फौजफाटा घेऊन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उद्ध्वस्त केलेला मुंब्य्राचा गुलाब बाजार पुन्हा गजबजला आहे. मुंब्रा स्थानक ते कौसा या चारेक किमीच्या रस्त्याच्या दुतर्फा पदपथ आणि रस्त्यावर अतिक्रमण करून भरवण्यात येणाऱ्या या बाजाराला ना पालिकेचे भय आहे ना आयुक्तांचे!

ठाणे महापालिकेच्या अलीकडच्या इतिहासत मुंब्रा आणि कौसा भागातील फेरीवाले, अतिक्रमणांविरोधात महापालिकेचे अधिकारी सहसा कारवाई करत नाहीत असा अनुभव आहे. साधारण वर्षभरापूर्वी संजीव जयस्वाल यांनी मात्र थेट मुंब्य्रात धडक दिली आणि रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमणांवर एकामागोमाग एक बुलडोझर चालविण्यास सुरुवात केली. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची ठोस साथ लाभल्याने भलामोठा फौजफाटा घेत मुंब्रा स्थानक ते कौसापर्यंत एका रांगेत उभे असलेला गुलाब मार्केटही जयस्वाल यांनी रिकामे केले. रस्त्याची एक बाजू आणि संपूर्ण पदपथ अडवून धरणाऱ्या या बाजाराला सहसा महापालिकेचे अधिकारी हात लावत नव्हते. राजकीय नेतेही ब्र उच्चारत नसल्याने येथून दिवसाला काही हजाराचा आणि रमझान महिन्यात काही लाखांचा हप्ता काढणारी एक मोठी टोळी कार्यरत झाली आहे. जयस्वाल यांनी धडाक्यात हा बाजार रिकामा केला आणि प्रसिद्धीचा झोत स्वत:कडे वळविला. या कारवाईचे मुंब्राच नव्हे तर ठाणे आणि आसपासच्या भागातही कौतुक केले गेले. शीळ, डायघर, दिवा या मुंब्य्राला लागून असलेल्या आगरी बहुल पट्टय़ात तर बाजारावरील कारवाई केल्याबद्दल जयस्वाल यांचे अभिनंदन करणारे फलकही लागले होते. प्रत्यक्षात कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी सुरू झालेला हा बाजार आजही सुरू आहे.

मुंब्रा स्थानक ते कौसा हे एरवी पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी गुलाब बाजारामुळे तब्बल ४५ मिनिटे लागतात. ठाणे स्थानकात जयस्वाल यांच्या धूमशानाची चर्चा आज सकाळपासून मुंब्य्रात होती. ‘जयस्वाल आदमी डॅशिंग है.. पर निचे के लोग खायेंगे और ठाणे में भी फिर ‘गुलाब’ खिलेगा’ अशी बोलकी प्रतिक्रिया याच बाजारातील एका कबाब विक्रेत्याने दिली. धडाकेबाज कारवाईला दूरदर्शी नियोजनाचीही साथ हवी. अन्यथा ठाण्यातही फेरीवाल्यांचे गुलाब पुन्हा बहरेल हेच मुंब्य्रातील गुलाब बाजार दाखवून देत होता.