पाचव्या सहाव्या मार्गिकेच्या महत्त्वाच्या टप्प्याच्या कामाला सुरुवात

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा या पाचव्या मार्गिकेच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या मुंब्रा रेतीबंदर येथील उन्नत मार्गावर दोन लोखंडी तुळया बसविण्याच्या कामाला येत्या रविवारी सुरुवात होत असून ७ आणि २१ मार्च अशा दोन दिवसांत हे काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राजस्थान येथून आणलेल्या या तुळया प्रत्येकी ३५५ टन वजनाच्या आणि ८० मीटर लांबीच्या आहेत. यासाठी रेल्वेचे १५० कामगार, ३२ रोलर आणि एका यंत्राच्या मदतीने हे काम पूर्ण केले जाणार आहे. या  कामासाठी मुंब्रा बाह्य़वळणावरील संपूर्ण वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. त्यामुळे रविवारी ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबिवली येथील वाहतूक व्यवस्थेवर भार येणार आहे.

मध्य रेल्वेवरील उपनगरीय गाडय़ांच्या फेऱ्या वाढाव्यात यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम करण्यात येत आहे. अनेक परवानग्यांमुळे हा प्रकल्प रखडला होता. सध्या या प्रकल्पाच्या मुंब्रा रेतीबंदर खाडीकिनारी असलेल्या उन्नत मार्गाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या उन्नत मार्गासाठी रेल्वेला दोन लोखंडी तुळया उभाराव्या लागणार आहे. त्यामुळे रेतीबंदर येथून जाणाऱ्या मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील रस्ते वाहतूक बंद करावी लागणार आहे. हा रस्ता बंद झाल्यास संपूर्ण शहर वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामासाठी वाहतूक पोलिसांकडून परवानगी देण्यात येत नव्हती. अखेर ७ आणि २१ मार्च या दोन दिवसांसाठी वाहतूक पोलिसांनी रेल्वेला या कामासाठी परवानगी दिली आहे.

वाहतुकीवर भार

पहिल्या टप्प्यामध्ये एक तुळई बसविली जाणार आहे. त्यानंतर २१ मार्चला दुसरी तुळई बसविण्यात येईल. या दोन्ही तुळयांचे वजन ३५५ टन असून ८० मीटर लांबीच्या या तुळया आहेत. तसेच त्यांची रुंदी सहा मीटर आणि उंची ११ मीटर आहे. राजस्थान येथून या तुळयांचे सांगाडे आणले होते. रेतीबंदर येथे या सांगाडय़ांना जोडण्यात आले. या कामामुळे मुंब्रा बाह्य़वळण मार्ग २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे. मुंब्रा बाह्य़वळण मार्ग हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून गुजरात, भिवंडी भागांतून नवी मुंबई जेएनपीटीला जाणारी हजारो वाहने या मार्गाचा वापर करत असतात. तसेच सर्वसामान्यांना उपनगरीय सेवेत ठरावीक वेळेव्यतिरिक्त प्रवासास मनाई आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, बदलापूर येथून मुंबई, ठाण्याच्या दिशेने जाणारी खासगी वाहनेही याच मार्गावरून ये-जा करत असतात. मात्र याचा फटका येथील वाहतूक व्यवस्थेला बसणार आहे.

वाहतूक बदल असे..

हलक्या वाहनांसाठी

नवी मुंबईहून मुंब्रा बाह्य़वळणमार्गे ठाणे, घोडबंदर येथे येणारी वाहने महापे, रबाळे, ऐरोली, मुलुंड टोलनाका, आनंदनगर मार्गे ठाण्यात येतील. किंवा कल्याण फाटा, शिळफाटा येथे डावीकडे वळून महापे चौक, रबाळे, ऐरोली, विटावा, कळवा नाका मार्गे ठाणे शहरात येतील. तसेच भिवंडीच्या दिशेने जाणारी वाहने कल्याण फाटा, कल्याण रोड, पत्रीपूल, दुर्गाडी, कोनगाव, रांजनोली मार्गे जातील.

नाशिकहून तळोजा, पनवेल, नवी मुंबईत जाणारी वाहने पडघा नाक्याहून, येवई नाका, सावद नाका, बापगाव, आधारवाडी, पत्रीपूल, चक्कीनाका, नेवाळी मार्गे, एमआयडीसी, तळोजा सिमेंट रोड येथून कळंबोली नवी मुंबईत जातील.

खारेगाव टोलनाका येथून नवी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने खारेगाव टोलनाका येथून माजिवडा, कॅडबरी जंक्शन, तीन हात नाका येथून मुलुंड टोलनाका, ऐरोली मार्गे जातील किंवा साकेत रोडने, कळवा खाडीपूल, विटावा मार्गे जातील. माजिवडा पुलाखालून गोकुळनगर मार्गे, कळवा, विटाव्याच्या दिशेने नवी मुंबईत जाण्याचा पर्यायही वाहनचालकांना उपलब्ध असेल.

अवजड वाहनांसाठी

उरण जेएनपीटीहून भिवंडी, नाशिकच्या दिशेने जाणारी अवजड वाहने नवी मुंबईतील कळंबोली चौक येथून उजवीकडे वळण घेऊन तळोजा एमआयडीसी, उसाटणे, खोणीफाटा, नेवाळीनाका, पत्रीपूल, दुर्गाडी चौकातून भिवंडी किंवा मुंबई-नाशिक महामार्गे नाशिकच्या दिशेने जातील.

जेएनपीटीहून घोडबंदर, ठाण्याच्या दिशेने येणारी वाहने कळंबोली चौक, न्हावडेफाटा येथून उजवीकडे वळण घेऊन कल्याणफाटा, शिळफाटा, येथून डावीकडे वळून, महापे, रबाळे, ऐरोली, मुलुंड टोलनाका, आनंदनगर मार्गे ठाणे घोडबंदरच्या दिशेने ये-जा करतील.

नाशिकहून मुंब्रा बाह्य़वळण मार्गे नवी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने खारेगाव टोलनाका येथून माजिवडा ब्रिज, कॅडबरी जंक्शन, तीन हात नाका, आनंदनगर येथून नवी मुंबईत जातील. किंवा रांजनोली, कोनगाव, दुर्गाडी चौक, चक्कीनाका, नेवाळी, खोणी गाव मार्गे जातील.