22 January 2018

News Flash

मुंब्रा बाह्य़वळण मार्गाला ‘राजकीय वळण’

बांधणीपासूनच हा मार्ग सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

खास प्रतिनिधी, ठाणे | Updated: October 12, 2017 1:41 AM

पालकमंत्र्यांच्या उन्नत मार्गाच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचा मोर्चा

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा शहरातील अवजड वाहनांसाठी असलेल्या मुंब्रा बाह्य़ वळण मार्गावरील वाहतूक कोंडी संपविण्याच्या उद्देशाने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उन्नत मार्ग उभारण्याची घोषणा करून २४ तास उलटत नाहीत, तोच या मार्गाच्या दुरुस्तीवरून नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबई-भिवंडी तसेच कल्याण-ठाणे-नवी मुंबई या मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. यासाठी पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

येत्या काही दिवसात स्वत: पालकमंत्री एकनाथ शिंदे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मोहीम हाती घेणार आहेत, असे शिवसेना गोटातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच चर्चेत असलेला मुंब्रा बाह्य़वळण मार्ग आता पुन्हा राजकीय पक्षांच्या केंद्रस्थानी आल्याचे दिसून आले.

मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या उभारणीनंतर काही महिन्यांतच या मार्गाच्या बांधणीबाबत अनेक प्रश्न उभे राहिले होते. या रस्त्याच्या कामाचा दर्जा सुमार असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. तसेच ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका बडय़ा नेत्याचे ठेकेदारासोबत असलेल्या लागेबांध्यामुळे या सुमार कामगिरीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोपही केले जात होते. त्यामुळे बांधणीपासूनच हा मार्ग सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

उरणच्या जेएनपीटी बंदरातून ठाणे, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणारी अवजड वाहने याच मार्गाचा मोठय़ा प्रमाणात वापर करतात. त्यामुळे या मार्गावर अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. या मार्गावर सुरू असलेली पथकर वसुली काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आल्यानंतर या मार्गाची आणखी दुरवस्था झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात या मार्गावर खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी अवजड वाहतूक संथगतीने सुरू होती.

यामुळे रेतीबंदरपासून शीळफाटय़ापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे या मार्गाला जोडणाऱ्या ठाणे, कळवा, शीळफाटा, कल्याण आणि महापे भागातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊन त्या ठिकाणीही वाहतूक कोंडी होते.

मध्यंतरी या मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादीने आंदोलन केले होते आणि त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या माध्यमातून तेथील खड्डे बुजवून घेतले होते.

दौरा नाही

एकीकडे मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादीने पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला असतानाच दुसरीकडे मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्याची चर्चा शहरात सुरू होती. मात्र, ठाणे आणि मुंबईतील कार्यक्रमांमध्ये पालकमंत्री व्यस्त असल्यामुळे सोमवारी त्यांनी असा कोणताही पाहणी दौरा केलेला नाही, असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

First Published on October 12, 2017 1:41 am

Web Title: mumbra outward turn traffic issue
  1. No Comments.