23 April 2019

News Flash

मुंब्रा स्टेडियम आंदण!

मुंब्य्रात नेहमीच ‘संघर्षां’चा देखावा उभा करत पुढे हातमिळवणीचे राजकारण करण्यात तरबेज असलेल्या एका मातबर नेत्याच्या आग्रहापुढे मान तुकवत यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची चर्चा आहे.

क्रीडासंकुल विनानिविदा खासगी संस्थेला; ‘संघर्ष’शील नेत्यासाठी पायघडय़ा

ठाणे जिल्ह्यचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मनोमीलनानंतर ठाणे महापालिकेत आता सर्वपक्षीय नेतेमंडळींचे लांगुलचालन सुरू झाले आहे. मुंब्रा येथील महापालिकेच्या मालकीचे भव्य क्रीडासंकुल कोणत्याही निविदेशिवाय पुन्हा एकदा एका खासगी संस्थेस प्रयोगिक तत्त्वावर भाडेतत्त्वावर देण्याचा वादग्रस्त निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मुंब्य्रात नेहमीच ‘संघर्षां’चा देखावा उभा करत पुढे हातमिळवणीचे राजकारण करण्यात तरबेज असलेल्या एका मातबर नेत्याच्या आग्रहापुढे मान तुकवत यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, आयुक्तांच्या सहमतीने मांडण्यात आलेल्या या वादग्रस्त प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्याची तयारी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे.

ठाणे शहरातील मैदाने बिल्डरांना विनानिविदा भाडेतत्त्वावर देण्याचा प्रशासनाचा निर्णय यापूर्वीच वादग्रस्त ठरला असताना ठाण्यातील शहीद तुकाराम ओंबळे क्रीडा संकुल आणि मुंब्य्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम अशाच पद्धतीने कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता खासगी संस्थांना भाडेपट्टय़ावर देण्याचा वादग्रस्त प्रस्ताव मध्यंतरी सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव तयार करताना महापालिका प्रशासनाने सत्ताधारी शिवसेना आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे हितसंबंध जोपासले आहेत, असा आरोप ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केला होता. विनानिविदा अशा वास्तू देता येणार नाहीत हा साधा नियम पाळला गेला नव्हता. त्याविरोधात प्रसारमाध्यमे आणि आमदार केळकर आक्रमक होताच यापुढे महापालिकेच्या सर्व वास्तू निविदा प्रक्रिया राबवूनच दिल्या जातील अशी घोषणा आयुक्त जयस्वाल यांनी केली होती. तसेच शहीद तुकाराम ओंबळे आणि मुंब्य्राचे स्टेडियम विनानिविदा भाडेपट्टय़ाने देण्याचे प्रस्तावही मागे घेण्यात आले होते. मात्र आता पुन्हा पालिकेने तोच प्रकार केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरातील राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या मनोमीलन नाटय़ानंतर मुंब्य्रातील हे स्टेडियम पुन्हा त्याच संस्थेला प्रायोगिक तत्त्वावर भाडेपट्टय़ावर देण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला असून यामागे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या मागणीचा आधार घेण्यात आला आहे. महापालिकेने कौसा येथील तब्बल ३० कोटी रुपयांचा खर्च करून मोठे क्रीडासंकुल उभारले आहे. या ठिकाणी तरणतलाव, फुटबॉल मैदान तसेच विविध प्रकारच्या खेळांसाठी सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. हे स्टेडियम स्वत: चालविण्याऐवजी खासगी संस्थेला भाडय़ाने देण्याचा प्रस्ताव मध्यंतरी महापालिकेने तयार केला होता. मात्र हे स्टेडियम शहराच्या एका कोपऱ्यावर असल्याने त्यास ठाणेकर खेळाडूंचा प्रतिसाद मिळणे कठीण आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे फोएनिक्स स्पोर्टस संस्थेने स्टेडियम चालविण्यास स्वारस्य दाखविताच हे काम या संस्थेला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकदा मागे घेण्यात आलेला निर्णय पुन्हा पुढे रेटण्यात आल्याने मुंब्य्रातील एका नेत्याला खूश करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही. दरम्यान, २० फेब्रुवारी रोजी झालेल्या महासभेत कौसाचे स्टेडियम सुरू करावे यासाठी मुंब्य्रातील नगरसेवकांनी आग्रह धरला होता. स्थानिक नगरसेवकांची नाराजी लक्षात घेऊन आणि सभागृहाची भावना विचारात घेऊन प्रायोगिक तत्त्वावर विनानिविदा हे स्टेडियम सदर संस्थेस चालविण्यास देण्यात आल्याचे क्रीडा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. नवा वास्तू अभिव्यक्ती स्वारस्य देकार होईपर्यंत हा ‘प्रयोग’ करण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

First Published on April 14, 2018 1:23 am

Web Title: mumbra stadium tmc