अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या महिन्यावर येऊन ठेपल्या असताना यासंबंधीच्या प्रक्रियेतील घोळ मात्र संपण्याचे नाव घेत नाही. प्रभाग आरक्षण प्रक्रियेतील घोळानंतर आता प्रारूप मतदार याद्यांमध्ये गडबड झाली असून अनेकांची नावे गायब झाल्याचे उघडकीस येत आहे. विशेष म्हणजे, अंबरनाथ नगरपालिकेच्या मतदारयाद्यांमध्ये कोल्हापूर, भिवंडी, मुंब्रा, कुर्ला अशा भागांत रहिवाशी असलेल्यांची नावे नोंदविल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्याने ही सगळी प्रक्रिया संशयाच्या फेऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
कोल्हापूर, भिवंडी, मुंब्रा, कुर्ला, आंध्र प्रदेश अशा ठिकाणी रहिवास असलेली अनेक नावे अंबरनाथ पश्चिमेतील काही प्रभागांमध्ये आढळून आली आहेत. पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ९, १७, २० आणि २१ मधील मतदार याद्यांत अनेक गंभीर चुका असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. ऑर्डनन्स भागातील प्रभाग क्र १७ मधील अनेक नावे वगळण्यात आली आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ही नावे अस्तित्वात होती. येथील काही मतदारांना चक्क मृत घोषित करून त्यांची नावे वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे.
अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष व नगरसेवक सदाशिव पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबीयांचीच नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत. बदलापूरच्या माजी नगराध्यक्षा स्नेहा पातकर यांच्या फोटोऐवजी एका वृद्ध महिलेचा फोटो छापण्यात आला आहे. तर येथील भाजयुमोचे अध्यक्ष अविनाश भोपी यांच्या संपूर्ण कुटुंबीयांची नावेदेखील गायब झाली आहेत. या प्रकाराबाबत अंबरनाथच्या सर्वपक्षीय नेत्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना ११ तारखेला सायंकाळी उशिरा घेराव घालून जाब विचारला. तेव्हा त्यांनी प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने आपणास बदल करण्याचे अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.
 बदलापुरातही गोंधळ
बदलापुरात काहींनी मतदार नोंदणीचे शासकीय सॉफ्टवेअर वापरून अनेकांची बोगस नोंदणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तक्रारी करताच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. मात्र याबाबत पुढे काहीही कार्यवाही झालेली नाही.
प्रसिद्ध झालेल्या याद्या या प्रारूप मतदार याद्या असून त्या अंतिम याद्या नाहीत. तसेच याद्यांमधील नावांच्या बाबतीत काही बदल असल्यास मतदारांना त्याची हरकत ऑनलाइन नोंदवता येईल. त्यामुळे अंतिम मतदार याद्या निर्दोष असतील.
अमित सानप, तहसीलदार, अंबरनाथ

मतदार याद्यांवरील हरकती ऑनलाइन
मतदारांना त्यांची नावे वगळण्यासाठी अथवा राहत्या प्रभागात घ्यावे ही सूचना करण्यासाठी http://localbody voterlist.maharashtra.gov.in/    या संकेतस्थळावर जाऊन व्यक्तिगत ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक नोंदवून हरकत घ्यावी लागणार आहे. हरकत घेण्याची शेवटची तारीख ही १७ मार्च असून २० मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.

समाविष्ट होण्यास नकार देणारी गावे
आशेळे, माणेरे, आडिवली, ढोकळी, चिंचपाडा, वसार-दावलपाडा, भाल, उंबार्ली, द्वारली.