तुंगारफाटा येथील टपऱ्या जमीनदोस्त
वसई पूर्वेच्या तुंगारफाटा येथील अनधिकृत बांधकामावर पालिकेच्या जी प्रभाग समितीने कारवाई करून बेकायदेशीर टपऱ्या जमीनदोस्त केल्या. मागील आठवडय़ात या ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकावर येथील फेरीवाल्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे पालिकेने बंदोबस्त घेऊन कारवाई केली.
वसई पूर्वेच्या तुंगारफाटा येथे फेरीवाल्यांनी अनेक अनधिकृत टपऱ्या उभ्या केल्या होत्या, तसेच बेकायदा हातगाडी लावून धंदा करत होते. यामुळे या परिसरात वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यावर पालिकेच्या प्रभाग समिती ‘जी’च्या पथकाने कारवाई करून २२ बेकायदेशीर टपऱ्या तोडल्या आणि १६हून अधिक हातगाडय़ा जप्त केल्या.
याच कारवाईबरोबर वसई पूर्वेतील गोखिवरे रेंज नाका येथील भूमापन क्रमांक २३१, डॉम्स कॉम्प्लेक्स येथील पत्राशेड बांधकाम तोडून टाकण्यात आले. तसेच प्रभाग समिती जी व एफच्या पथकाने संयुक्त कारवाई करून सातिवली नाका, तुंगारफाटा, मौर्यानाका येथील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली.
हल्लेखोर फेरीवाल्यांना अटक
मागील आठवडय़ात तुंगारफाटा परिसरात अवैध पद्धतीने भाजीविक्री करणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला केला होता. या वेळी दोन वाहनांची तोडफोडही करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी हल्लेखोर फेरीवाल्यांना अटक केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2018 12:53 am