मात्र राजावली खाडीतील ढिगारा पूर्णत: काढल्याचा महापालिकेचा दावा

वसई : राजावली खाडीतील वादग्रस्त पूल महापालिका प्रशासनाने तोडला असला तरी खाडीत अजूनही भराव असल्याचे चित्र आहे. पूल तोडताना त्याचा भरावही काढून टाकायला हवा होता, अशी अपेक्षा विरोधी पक्षांनी व्यक्त केली. पालिकेने मात्र सगळा भराव काढल्याचा दावा केला आहे.

वसई पूर्वेच्या राजावली खाडीत असलेल्या अनधिकृत पुलामुळे वसईत पूर आला होता. हा लोखंडी पूल उभारताना खाडीत मातीचा भराव टाकून खाडीचे पात्र बुजवण्यात आले होते. महापालिकेने पूल हटवला. मात्र पूल तोडताना पालिकेने संपूर्ण भराव काढून टाकला नाही. शिवसेनेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी या ठिकाणाची पाहणी केली तेव्हा खाडीत अजूनही मातीभराव असल्याचे सांगितले. ही खाडी २० फूट खोल आहे. पालिकेने वरवरचे लोखंडी पाइप काढले, मात्र खालचा गाळ काढण्यात आला नसल्याचे शिवसेनेच्या मिलिंद चव्हाण यांनी सांगितले. ही खाडी पूर्ण स्वच्छ करून पूर्वीसारखा प्रवाह करण्याची मागणी त्यांनी केली.

पुलाशी पालिकेचा संबंध नाही ; महापालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण

वसईच्या पुराला जबाबदार असणाऱ्या राजावली खाडीतील पुलाची मालकी कोणाची हे अजून समजले नसले तरी महापालिकेने मात्र त्या पुलाचा आणि महापालिकेचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा पूल बेकायदा होता आणि त्याने खाडीचे पाणी अडवले होते, त्यामुळे आम्ही तो जमीनदोस्त केल्याचे आयुक्तांनी सांगितले.

राजावली खाडीतील पूल कोणाचा हे एक कोडे बनले आहे. शिवसेनेने हा पूल ‘सहारा समूहा’चा असल्याचा आरोप केला आहे. मात्र शासकीय दरबारी या पुलाची नोंद नाही. त्यामुळे पूल कोणाचा हे कुणीच सांगण्यास तयार नाही. शिवसेनेने या पुलाबाबत तहसीलदार आणि महापालिकेला जबाबदार धरले आहे. पालिकेने मात्र पुलाचा काही संबंध नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले. ९ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे वसईत पूर आला. त्या वेळी माजी महापौर नारायण मानकर आणि उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स यांनी या पुलाबाबत माहिती दिली आणि कारवाई केल्याचे आयुक्तांनी सांगितले. पूल पाडण्यात आलेला आहे. मातीभराव आणि मिठागराच्या जागेत असल्याने त्याचा पालिकेशी संबंध येत नसल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम खात्यानेही हा पूल आमचा नसल्याचे सांगितले आहे. तो पूल कुणाचा आहे, यावरही त्यांनी भाष्य केले नाही. दोन वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला होता. त्या वेळी स्थानिक मीठ उत्पादक मनोज जोशी यांनी सर्व शासकीय यंत्रणांकडे तक्रारी करून हा पूल आणि पुलामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत माहिती दिली होती. मात्र तेव्हा कुणीच लक्ष दिले नव्हते.

सत्यशोधन समितीकडून पूरग्रस्तांच्या भेटी

वसई :  वसईतील पूरस्थितीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या सत्यशोधन समितीने पूरस्थितीबाबत उपाययोजना करण्यासाठी नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. शनिवारपासून सत्यशोधन समिती शहरातील प्रत्येक प्रभागात भेट देणार आहे. सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी पालिका अधिकाऱ्यांची दोन दिवस बैठका घेऊन पूरस्थितीबाबत चर्चा केली.

वसईतील पूरस्थितीचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेने सत्यशोधन समिती स्थापन केली होती. त्यात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), सीईएसई (पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्र) सीईआरई (पर्यावरण संशोधन आणि विज्ञान केंद्र) या संस्थांच्या सदस्यांचा समावेश आहे. ही समिती आठ प्रमुख मुद्दय़ांचा अभ्यास करत आहे. त्यात शहराच्या सध्याची रचना, पायाभूत सोयीसुविधा, विकास आराखडा, वसईत पडणाऱ्या पावसाचे स्वरूप आणि यापूर्वी पडलेला पाऊस यांचा अभ्यास केला जात आहे. शहरातील पाणी तुंबण्याची कारणे काय आहेत आणि ठिकाणे कोणकोणत्या ठिकाणी पाणी साठवले जाते ते निश्चित करणार आहे.

या सत्यशोधन समितीने गुरुवारी आणि शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत आयुक्त सतीश लोखंडे यांनी वसईत आलेली पूरस्थिती, अस्तित्वातील परिस्थिती, मुलभूत सुविधा इत्यादी माहितीचे सादरीकरण केले. छायाचित्रांच्या आधारे आधीची आणि आताची परिस्थिती, कुठे कुठे पाणी साचले होते, नैसर्गिक नाले, खाडय़ा, उघडी गटारे,  धारण तलाव (होल्डिंग पॉण्ड) यांचे नियोजन सादर केले. या समितीमार्फत या क्षेत्राची भौगोलिक परिस्थिती, सरासरी पर्जन्यमान यांचा अभ्यास करून स्थानिक ठिकाणी भेटी देऊन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे.

सत्यशोधन समिती आता नागरिकांची मते जाणून घेणार असून शनिवारपासून शहरातील विविध प्रभागात भेटी देणार आहेत.

– सतीश लोखंड, आयुक्त, महापालिका

पालिकेने खाडीतील सर्व भराव काढून टाकला आहे. आम्ही सलग तीन दिवस यंत्राच्या साहाय्याने भराव आणि खाडीतील गाळ काढला आणि पूल तोडला.

– विश्वनाथ तळेकर, साहाय्यक आयुक्त, महापालिका