पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर ठाणे शहरातील टेकडय़ांवर नवे बांधकाम होऊ देणार नाही, ही महापालिका प्रशासनाची घोषणा पुन्हा एकदा हवेत विरली आहे. संजय गांधी उद्यानालगत असलेल्या मामा-भाचा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या रूपादेवीच्या टेकडीवर गेल्या काही महिन्यांपासून चक्क दोन-तीन मजली इमारती उभ्या राहत आहेत. आधीच बेकायदा वस्तीमुळे कुप्रसिद्ध असलेल्या या टेकडीवर उभे करण्यात आलेले बेकायदा बांधकामांचे इमले स्थानिक रहिवाशांनाच धोकादायक ठरण्याची भीती आहे. मात्र, महापालिकेने या बांधकामांकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
ठाणे शहराच्या पश्चिमेकडील टोकाला अशीच उभी राहिलेली रूपादेवी पाडा ही वस्ती तर बोकाळलेल्या बेकायदा बांधकामांचे ठसठशीत उदाहरण आहे. मामा-भाचे डोंगराच्या अगदी पायथ्यापासून टेकडीच्या टोकापर्यंत झोपडय़ा नि पक्क्या बांधकामांच्या चाळी उभ्या राहिल्या आहेत. माळीण दुर्घटनेनंतर या टेकडीवर राहणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तेव्हा टेकडय़ांवर एकही नवे बांधकाम होऊ देणार नाही, अशी भूमिका पालिकेने जाहीर केली होती. रूपादेवी पाडा तसेच हनुमाननगर येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची चर्चाही मध्यंतरी सुरू होती. मात्र, यापैकी काहीही न होता, या परिसरात चाळींच्या जागी आता इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. उत्तर भारतीयांचे प्राबल्य असलेल्या या वस्त्यांवर असलेल्या राजकीय वरदहस्तामुळे या बेकायदा इमारतींना संरक्षण लाभल्याचे बोलले जात आहे. स्वस्तात घरे मिळत असल्याने अनेक नागरिक ही घरे विकत घेतात. मात्र, ही बांधकामे बेकायदा आणि रातोरात उभारण्यात आल्याने त्यात राहणाऱ्या जीवितास धोका निर्माण होत आहे. यासंबंधी काही स्थानिकांनी महापालिकेच्या रायलादेवी प्रभाग समितीकडे तक्रारही केली. मात्र, पालिकेच्या अतिक्रमण पथकाने अजिबात कारवाई केली नाही.