ठाणे महापालिकेने नव्यानेच सुरू केलेल्या ग्लोबल हब येथील कोविड रुग्णालयात मृतदेहांच्या अदलाबदलीचा जो प्रकार घडला त्याबद्दल मी संबंधीत कुटुंबाची माफी मागतो, अशा शब्दात आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी गुरुवारी झाल्या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. या प्रकरणी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रुपेश शर्मा यांची तातडीने बदली करण्यात आली असून चार परिचारिकांना कागदपत्रांतील घोळ झाल्याने निलंबित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे महापालिकेने बाळकुम येथे सुरू केलेल्या कोविड रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक रुग्ण बेपत्ता झाल्याची तक्रार पुढे आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रुग्णांच्या मृतदेहाची अदलाबदली झाल्याचे प्रकरणही उघडकीस आले. यामुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. भाजपने या प्रकरणी थेट राज्यपालांची भेट घेतल्याने सत्ताधारी शिवसेनेतही यांमुळे अस्वस्थता होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी गुरुवारी पत्रकार परिषदत घेत जाहीर दिलगिरी व्यक्त केली. तसेच यापुढे कोणत्या उपाययोजना हाती घेतल्या जातील याचीही माहिती दिली.