महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाकुल्या दाखवत गणवेश परिधान करण्यात कुचराई करणाऱ्या शिपायांना आयुक्त संजीव जयस्वाल यांनी वठणीवर आणले. आयुक्तांनी नुकताच मुख्यालय इमारतीचा दौरा केला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विभागांची पाहाणी केली.
शिपायांनी गणवेश परिधान करून असणे सक्तीचे आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनात विना गणवेश वावरणाऱ्या या शिपायांची आयुक्तांना पाहून पाचावर धारण बसली. मग वर्षांनुवर्षे कपाटात ठेवलेले गणवेश बाहेर आले आणि शिपाई गणवेशात वावरू लागल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे. ठाणे महापालिका मुख्यालयातील वेगवेगळ्या विभागात शिपाई कार्यरत आहेत. याशिवाय, नऊ प्रभाग समिती कार्यालये, जलकुंभ, उद्यान, कळवा रुग्णालय आदी ठिकाणीही शिपाई काम करतात. या शिपायांना कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत महापालिकेचा खाकी गणवेश परिधान करणे सक्तीचे आहे. मात्र, गेले अनेक वर्षे काही शिपाई खाकी गणवेश घालत नसून साध्या वेशातच महापालिकेत मिरवीत असतात. मध्यंतरी, याच पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने गणवेश घालत नसलेल्या कर्मचाऱ्यांचा धुलाई भत्ता बंद करण्याचा निर्णय घेऊन यासंबंधी परिपत्रकही काढण्यात आले. तसेच गणवेश घालणार नाही, अशा कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशाराही परिपत्रकात देण्यात आलेला आहे.