परवानग्या न घेता सभागृहाचे बांधकाम; पत्नीचेही नगरसेवकपद धोक्यात
कल्याण पूर्व भागातील काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन पोटे यांचे वादग्रस्त अनधिकृत बांधकाम महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम हटाव पथकाने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले. याच बांधकामावरून पोटे यांचे नगरसेवकपद गेल्या वर्षी रद्द करण्यात आले होते. विशेष म्हणजे या प्रकरणात पोटे यांच्या पत्नी आणि तत्कालिन नगरसेविका जान्हवी पोटे यांचाही सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने त्यांचेही पद रद्द होण्याची शक्यता आहे.
कल्याण पूर्व भागात सचिन पोटे यांनी मालकीच्या जागेत भव्य सभागृह बांधले होते. हे बांधकाम पालिकेच्या परवानग्या न घेता बेकायदा बांधले होते. या बेकायदा बांधकामप्रकरणी पोटे विरोधकांनी पालिकेत तक्रारी केल्या होत्या. या बांधकामाशी आपला संबंध नाही, असे पोटे यांनी पालिका अधिकाऱ्यांना कळविले होते. राजकीय दबावामुळे पालिकेकडून या बेकायदा सभागृहाच्या बांधकामावर कारवाई होत नव्हती, अशा तक्रारी पुढे आल्या होत्या. कल्याण पूर्वमधील रहिवासी प्रकाश गायकवाड यांनी पोटे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात बेकायदा बांधकाम व नगरसेवकपद रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती.
न्यायालयाने पोटे यांनी बेकायदा बांधकाम केले असेल तर ते तोडून टाकण्याचे तसेच पोटे यांच्या नगरसेवक पदाबाबत निर्णय घेण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. दरम्यान, महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी शुक्रवारी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात प्रत्येक प्रभागात जेवढी अनधिकृत बांधकामे असतील ती तोडून टाकण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोटे यांच्या बेकायदा सभागृहावर कारवाई करण्यात आली, अशी माहिती प्रभाग अधिकारी शांतीलाल राठोड यांनी दिली. दरम्यान, सचिन पोटे यांच्या पत्नी नगरसेविका जान्हवी पोटे यांनाही महापालिकेने नगरसेवक पद रद्द करण्याची नोटीस बजावली आहे. सचिन यांचा बेकायदा बांधकामांशी संबंध असल्याने जान्हवी याही ‘एमआरटीपी’ कायद्याने तितक्याच दोषी असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. जान्हवी पोटे यांनी पालिकेच्या नोटिशीला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

माजी नगरसेवकाचे अतिक्रमण
कल्याणमधील ठाणगेवाडी येथील रिक्षा स्थानकाजवळ एका माजी नगरसेवकाने दोन गाळ्यांची बांधकामे केली आहेत. या गाळ्यामध्ये त्यांचा व्यवसाय सुरु आहे. या बांधकामांमुळे पालिकेच्या विकास आराखडय़ातील रस्त्याला अडथळा येत आहे. या गाळ्यांच्या पाठीमागे या माजी लोकप्रतिनिधीने वाढीव बांधकाम केले असल्याच्या या भागातील रहिवाशांच्या तक्रारी आहेत. पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरुन, सत्तेचा दुरुपयोग करुन हा लोकप्रतिनिधी गाळ्यांचे संरक्षण करीत असल्याची ठाणगेवाडी भागातील रहिवाशांमध्ये चर्चा आहे.