बदलापूर नगरपालिकेची निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर २१ जानेवारीला पालिका प्रभाग आरक्षण प्रक्रियेत चूक झाली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकत घेण्यात आली. त्याला मान्यता देत प्रभाग क्र. २१ वर पडलेले चुकीचे आरक्षण बदलण्यासाठी फेरसोडत घेण्यात आली होती. ही फेरसोडत घ्यावी लागण्याच्या मुद्दय़ावरून पालिकेचे अभियंता प्रवीण कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. २१ जानेवारीला झालेल्या सोडतीच्या वेळी प्रक्रियेत सूत्रसंचालकाची भूमिका बजावत होते.
परंतु सामान्य प्रशासनाचे अधिकारी व मुख्य प्रशासकीय अधिकारी यांची त्यावेळची मुख्य भूमिका असून त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या घोळाचा फटका पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनाच बसला आहे. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
याबाबत माहिती घेण्यासाठी मुख्याधिकारी पवार यांच्याशी फोनवरून दोनदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
निवडणूक आयोग व ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र सोडतीचा घोळ गांभीर्याने घेतला असून  आरक्षण प्रक्रिया पार पाडणारे महत्त्वाचे घटक मात्र नामानिराळे राहिले आहेत व अभियंता कदम यांचा यात बळी जात असल्याची चर्चा सुरू होती.
दरम्यान, तक्रारदारांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी धाव घेतली आहे.