पालिका शाळेतील वर्गाचे अनेक महिन्यांचे भाडे थकीत

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नेतिवली येथील पालिका शाळेच्या वर्गामध्ये दादर येथील नवनिर्माण शिक्षण संस्था गेल्या काही वर्षांपासून गरजू-गरीब विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा चालविते. पालिकेने संस्थेला हे वर्ग भाडय़ाने दिले आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून संस्थेने पालिकेच्या शिक्षण विभागाला भाडे दिले नसून तब्बल ७५ हजार रुपये भाडे थकीत आहे. भाडे मिळण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संस्थेला अनेकदा नोटिसा दिल्या, मात्र तरीही संस्थेकडून दखल घेतली जात नसल्याचे महापालिका सूत्रांकडून सांगण्यात आले.

कल्याणमधील एका ‘भाजप’ आमदाराचा या संस्थेला ‘आधार’ असल्याने ही वसुली होत नसल्याचे समजते. महापालिकेच्या शिक्षण विभागाने दोन ते तीन खोल्या संस्थेला संध्याकाळच्या वेळेत रात्रशाळा

चालविण्यासाठी दिल्या आहेत. संस्थेकडून वर्गखोल्यांचा नियमित वापर केला जातो, मात्र शाळेचे भाडे, वीज देयकाची रक्कम देण्यास काही वर्षांपासून टाळाटाळ केली जात आहे. महापालिकेने नोटीस बजावली की संस्थेचा पदाधिकारी पालिकेत येतो आणि थेट ‘भाजप’च्या कल्याणमधील एका आमदाराशी संपर्क करून महापालिका अधिकाऱ्यांना त्या आमदाराशी बोलायला लावतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. आमदाराकडून भ्रमणध्वनी येत असल्यामुळे नोटीस पाठविण्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही कारवाई या संस्थेवर करता येत नाही, अशी हतबलताही या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

संस्थेकडून देयक वसुली करण्याची कार्यवाही आम्ही करीत आहोत. संस्थेकडून रात्रशाळा चालविण्यात येते. कठोर कारवाई केली तर विद्यार्थ्यांचेच नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून विचारपूर्वक निर्णय घेण्यात येईल. संस्था पदाधिकाऱ्यांशी बोलून देयक वसुलीसाठी प्रयत्न सुरू असून या प्रकरणी कोणाचाही राजकीय दबाव नाही.

– नितीन नार्वेकर, उपायुक्त, शिक्षण विभाग